निर्यातपूरक उपायांचा ‘साखर परिषदे’त तज्ज्ञांकडून आग्रह

ब्राझील, युरोपीय महासंघ, युक्रेन व थायलंडमधील कमी उत्पादनामुळे यंदा जागतिक स्तरावर साखर उत्पादन अतिरिक्त होणार नसून, ते वाजवी पातळीवर स्थिरावलेले दिसेल. या बदललेल्या स्थितीत साखरेचा तुटवडा भासणाऱ्या देशांना निर्यातीसाठी भारताला पुढे सरसावण्याची संधी असल्याचे प्रतिपादन साखर निर्यातीसंदर्भात सोमवारी आयोजित परिसंवादात सहभागी तज्ज्ञांनी केले.

जागतिक स्तरावर साखरेच्या मागणीची पूर्तता भारताला करता येईल आणि सुमारे ५ दशलक्ष टन अतिरिक्त साखरेच्या निर्यातीची पूर्तता भारत करू शकेल. म्हणूनच यंदाच्या वर्षांत साखरेचे जागतिक दर ठरवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका भारताकडून बजावली जाईल, असे प्रतिपादन श्री रेणुका शुगर्स लि.चे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी केले. ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन (एआयएसटीए) आणि महाराष्ट्र साखर संघाच्या संयुक्त विद्यमाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

लंडनमधील मॅरेक्स स्पेक्ट्रॉन या जागतिक कमोडिटी ट्रेडिंग कंपनीचे विश्लेषक देव गिल यांच्या मते, साखर वर्ष २०१८-१९ साठी साखरेचे जागतिक उत्पादन १८७ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. हे प्रमाण मागील वर्षांतील १८६ दशलक्ष टन साखरेच्या वापराएवढेच आहे. याचा गेल्या वर्षी उत्पादित १६ दशलक्ष टन साखर अतिरिक्त ठरली होती. पेट्रोलचे वाढते भाव पाहता ब्राझीलने आपला बहुंताश ऊस इथेनॉल निर्मितीकडे वळवला आहे. ज्यामुळे मागील वर्षांच्या तुलनेत यंदा १० दशलक्ष टन साखरेचे उत्पादन अतिरिक्त ठरेल. यामुळे साखरेच्या जागतिक किमतीत आताच मोठी वाढ झाली आहे.

सुरुवातीला एआयएसटीएचे अध्यक्ष प्रफुल विठलानी यांनी उत्पादनात वाढीबरोबरच साखरेच्या निर्यातीसाठी कारखान्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.