२०२०-२१ मध्ये मागणी ११ टक्क्यांनी रोडावली

मुंबई : करोना साथीचा प्रसार, टाळेबंदीसारखे निर्बंध तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंदी, माल वाहतूक क्षेत्रातील आव्हाने या पाश्र्वाभूमिवर भारताची सागरी खाद्यान्न निर्यात गेल्या वित्त वर्षात कमालीने खाली आली आहे.

आर्थिक वर्ष २०२०-२१मध्ये देशाची सागरी खाद्य वस्तूंची निर्यात ११.४९ लाख मेट्रिक टन झाली असून वार्षिक तुलनेत त्यात १०.८८ टक्के घसरण नोंदली गेली आहे. भारतीय चलनात ही रक्कम ४३,७१७.२६ कोटी रुपये (५.९६ अब्ज डॉलर) आहे.

भारताच्या नव्याने उभारी घेणाऱ्या सागरी खाद्यान्न क्षेत्रावर कोविड महासाथआणि मंदावलेल्या विदेशी बाजाराची छाया उमटली आहे. अमेरिका, चीन आणि यूरोपियन यूनियन (ईयु) हे आयात करण्यात अग्रगण्य राहिले. तर कोळंबी हा सर्वाधिक निर्यात होणारा घटक ठरला. मासे याबाबत दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

२०१९-२० मध्ये भारताने १२.८९ लाख मेट्रिक टन समुद्री खाद्यान्नाची निर्यात केली होती व त्याचे मूल्य ४६,६६२.८५ कोटी रुपये (६.६८ अब्ज डॉलर) होते व २०२०-२१ मध्ये रुपयाच्या स्वरूपात  ६.३१ टक्के घट झाली तर डॉलरच्या स्वरूपात १०.८१ टक्के घट झाली.

मरीन प्रॉडक्टस एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट ऑथोरिटीचे (एमपीईडीए) अध्यक्ष के. एस. श्रीनिवास यांनी सांगितले की, गेल्या वित्त वर्षाच्या पहिल्या सहामाहीत खाद्यान्न निर्यातीवर करोना साथ प्रसारानंतरच्या घडामोडींचा विपरित परिणाम झाला. मात्र २०२०-२१ च्या शेवटच्या तिमाहीत निर्यातीत वाढ झाली. तसेच गेल्या आर्थिक वर्षामध्ये मासे क्षेत्रात प्रगती झाली. डॉलरच्या स्वरूपात निर्यात केलेल्या घटकांमध्ये या क्षेत्राचा वाटा तब्बल ६७.९९ टक्के होता. तर एकूण वजनात ४४.४५ टक्के वाटा होता. २०१९-२० च्या तुलनेत ते अनुक्रमे ४.४१ टक्के आणि २.४८ टक्के अधिक आहे,असेही ते म्हणाले.

कोळंबीचा एकूण वजनात ५१.३६ टक्के तर डॉलर उत्पन्नात ७४.३१ टक्के वाटा होता. याबाबत अमेरिका (२,७२,०४१ टन) सर्वांत जास्त आयात करणारा देश ठरला.