चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या महिन्यात निर्यातीत वाढ व आयातीत घट नोंदविली गेल्याने व्यापार तूट १० अब्ज डॉलर राहिली आहे. वर्षभरापूर्वीच्या १७.६७ अब्ज डॉलरच्या तुलनेत ती समाधानकारक आहे. एप्रिलमध्ये निर्यात ५.२६ टक्क्यांनी वाढून २५.६३ अब्ज डॉलर झाली आहे, तर आयात १४.९९ टक्क्यांनी कमी होत ३५.७२ अब्ज डॉलर झाली आहे. एप्रिल २०१३ मध्ये व्यापार तूट १७.६७ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. गेल्या महिन्यात सोने व चांदीसारख्या मौल्यवान धातूंची आयात ७०.०८ टक्क्यांनी कमी होत २.२२ अब्ज डॉलपर्यंत खाली आली आहे. वर्षभरापूर्वी एप्रिलमध्येच ती ७.४२ अब्ज डॉलर होती. तर मे २०१३ मधील ८.४० अब्ज डॉलरनंतर त्यात सातत्याने घट नोंदली गेली आहे.