कोरियातून आयात होणारे वाहनांचे सुट्टे भाग, युरोप, अमेरिका आणि जपानमधून आयात होणाऱ्या भागांपेक्षा स्वस्त आहेत, तसेच त्यांचा दर्जाही चांगला आहे. त्यामुळे भारत व कोरिया यांच्यामधील व्यापारात वाढ होईल, अशी माहिती टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक एस. बी. बोरवणकर यांनी दिली.
‘कोरियन ऑटोपार्ट प्लाझा’ च्या प्रदर्शनाचे उद्घाटन बोरवणकर व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष एस. के. जैन यांच्या हस्ते मंगळवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते.
कोरियातून आयात केलेले भाग युरोप, अमेरिका व जपानच्या तुलनेत १० ते २० टक्के स्वस्त असतात. त्यामुळे कोरिया आणि भारत यांच्या दरम्यान स्वयंचलित वाहन उद्योगात वाढ होण्याची, तसेच पुढील एक ते दीड वर्षांत कोरियन कंपन्या आणि भारतीय कंपन्या यांच्यामध्ये संयुक्त प्रकल्प होण्याची शक्यता आहे. या प्रदर्शनात १८ जागतिक दर्जाची पॉवर ट्रेन्स, इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा, अंतर्गत सुरक्षा यंत्रणा यांसारखी स्वयंचलित तंत्रज्ञाने व उत्पादने असतील. उत्पादन पुरवठा, तंत्रज्ञान हस्तांतरण यांसारख्या विषयांवर बैठका व चर्चा होणार आहेत, असे बोरवणकर म्हणाले. या प्रदर्शनात देस्को, जेक्स, डोंगिन थर्मो, इएनए इंडस्ट्री कंपनी लिमिटेड, जीएमबी कोरिया, यांसारख्या कंपन्या प्रदर्शनात सहभागी झाल्या होत्या.