किरकोळ पाठोपाठ देशाचा घाऊक महागाई दरही गेल्या महिन्यात किमान पातळीवर विसावला आहे. फळभाज्यांसह एकूणच खाद्यान्याच्या किंमती कमी झाल्याने फेब्रुवारीतील घाऊक महागाई दर ५ टक्क्यांखाली येताना गेल्या नऊ महिन्याच्या नीचांकी स्तरावर पोहोचला आहे. या कालावधीत हा दर ४.६८ टक्के राहिला आहे. याच आठवडय़ात जाहिर झालेल्या फेब्रुवारीतच किरकोळ महागाई दरही ८.१० टक्के असा गेल्या २५ महिन्यातील खालच्या स्तरावर राहिला आहे.
२०१४ च्या दुसऱ्या महिन्यात किरकोळ तसेच घाऊक महागाई दर कमी झाल्याने रिझव्‍‌र्ह बँकेच्या एप्रिलच्या पतधोरणात व्याजदर कपातीबाबत आशा उंचावल्या आहेत. जानेवारी औद्योगिक उत्पादन दरही अवघा ०.१ टक्क्यांनी वधारल्याने अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी व्याजदर कपातीची आवश्यकता प्रतिपादन केली गेली आहे. मध्यवर्ती बँकेचे आगामी पतधोरण १ एप्रिल रोजी आहे. यापूर्वी सलग तीन वेळा गव्हर्नर डॉ. राजन यांनी प्रत्येकी पाव टक्का व्याजदर वाढ केली आहे.
घाऊक महागाई दर फेब्रुवारी २०१३ मध्ये ७.२८ टक्के तर जानेवारी २०१४ मध्ये ५.०५ टक्के होता. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकूणच महागाई दर कमी होत आहे, ही समाधानाची बाब असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी म्हटले आहे. सरकार तसेच रिझव्‍‌र्ह बँकेसाठी चिंताजनक असलेल्या खाद्यान्य महागाईचा दरही यंदाच्या फेब्रुवारीत महिन्याभरापूर्वीच्या ८.८० टक्क्यांवरून ८.१२ टक्क्यांवर आला आहे.
घाऊक किंमत निर्देशांक डिसेंबर २०१३ पासून कमी होत आहे. यापूर्वी मे २०१३ मध्ये महागाई दर ४.५८ टक्के अशा किमान पातळीवर होता. त्यानंतर जूनपासून नोव्हेंबपर्यंत तो वाढतच राहिला. यंदा कादे तसेच बटाटय़ाच्या किंमती अनुक्रमे २० व ८ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. भाज्या १६.६ टक्क्यांवरून थेट ३.९९ टक्क्यांपर्यंत घसरल्या आहेत. डाळी, गहू, मसालेही स्वस्त झाले आहेत. फळे, तांदूळ, दुध यांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.