देशातील सर्वात मोठे व्हाईट लेबल एटीएम नेटवर्क इंडिकॅश चालविणारी कंपनी टाटा कम्युनिकेशन्स पेमेन्ट सोल्यूशन्स लिमिटेड (टीसीपीएसएल) ने व एसटी महामंडळाच्या सहकार्याने महाराष्ट्रातील सर्व बसस्थानकावर एटीएम मशीन बसविण्याच्या दृष्टीने पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. याचा एक भाग म्हणून प्रायोगिक तत्वावर कुर्ला (नेहरुनगर) व पनवेल बसस्थानकामध्ये ‘इंडिकॅश’ एटीएम मशीन बसविण्यात आले आहे.
दोन वर्षांच्या कालावधीत इंडिकॅशद्वारा २२ राज्यांमध्ये आणि ३,५०० शहरांमध्ये ६,५०० एटीएमचे जाळे तयार करण्यात आले  आहे. इंडिकॅशद्वारे यापूर्वीच महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांमध्ये ७५० एटीएमचे जाळे उभारण्यात आले आहे. यामध्ये मुंबई आणि ठाण्यातील १७५ इंडिकॅश एटीएमचा समावेश आहे.
टाटा कम्युनिकेशन्स पेमेन्ट सोल्यूशन्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पटेल यावेळी म्हणाले की, देशाच्या दूरगामी भागात ग्राहकांना एटीएमची सेवा उपलब्ध करून देणे ही इंडिकॅश एटीएम नेटवर्कची मोहीम आहे. हे उद्दिष्ट साध्य करताना एसटी महामंडळाबरोबरच्या नव्या सहकार्यामुळे दूरस्थ भागात राहणाऱ्या ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट पूर्ण होईल.
एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक संजय सुपेकर म्हणाले की, इंडिकॅश एटीएमच्या सहकार्याने ५०० पेक्षा जास्त ग्रामीण बस स्थानवर प्रवास करणाऱ्या ७० लाख प्रवाशांना एटीएमची सेवा उपलब्ध होत आहे.