निर्देशांकांची दोन वर्षांतील उच्चांकावर झेप
काल जाहीर झालेल्या एप्रिल महिन्याच्या महागाईच्या आकडय़ांमुळे व्याजदरात कपातीच्या बळावलेल्या अपेक्षा आणि अमेरिकेच्या बाजारातील तेजी या परिणामी भांडवली बाजाराने बुधवारी वर्षभरातील सर्वात मोठी झेप घेतली. मुंबई शेअर निर्देशांक- सेन्सेक्सने ४९०.६७ अंशांची कमाई करीत २०,२१२.९६ असा गेल्या सव्वादोन वर्षांतील उच्चांकी स्तर गाठला.
दर कपातीच्या अपेक्षेने बुधवारी बाजारात व्याजदराबाबत संवेदनशील कंपन्या विशेषत: बँकांच्या भावात मोठी वाढ दिसून आली. रिझव्‍‌र्ह बँकेने १७ जूनच्या आपल्या आगामी पतधोरण आढाव्यात महागाई दरातील नरमाईला जरूर ध्यानात घेतले जाईल, असे स्पष्टीकरण आज केले. परिणामी, बाजारात उधळलेला तेजीचा वारू इतका दमदार होता की, सेन्सेक्स निर्धारित करणाऱ्या ३० समभागांपैकी केवळ विप्रोचा (०.७८ टक्के) समभागाचा भाव खाली बंद झाला.
सेन्सेक्सने आज दाखविलेला २०,२१२.९६ अंशांचा स्तर हा जानेवारी २०११ नंतरच प्रथमच बाजाराने अनुभवला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही १५१.५३ अंश म्हणजे २.५२ टक्क्यांनी वधारून ६,१४६.७५ वर बंद झाले. दोन्ही निर्देशांकांचे आजचे बंद हे त्यांचे वार्षिक उच्चांक आहे, तर मुंबई शेअर बाजाराचे सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांककालच्या तुलनेत वर होते. गृहवित्त पुरवठादार एचडीएफसी (४.७०%), बँकिंग अग्रणी स्टेट बँक (४.०७%), लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो (३.८५%), आयसीआयसीआय बँक (३.८०%), एचडीएफसी बँक (३.७२%) यांनी निर्देशांकांच्या आगेकुचीला सर्वाधिक योगदान दिले.
एकीकडे मंदावलेल्या अर्थविकासाचे मूळ कारण ठरलेल्या भाववाढीच्या साडेसातीचे फास सैल होत असल्याचे संकेत मिळत असताना, अमेरिकेत आर्थिक उभारीच्या घटनाक्रमाने आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवरील दाटलेले मळभही दूर होत आहेत. देशात निवळत असलेल्या अर्थचित्राने निर्माण केलेल्या उत्साहाला        विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून निरंतर सुरू असलेल्या खरेदीच्या पाठबळाने             उधाणाचे रूप मिळवून दिल्याचा प्रत्यय बुधवारी बाजारातील भाव हालचालीने दिला.

तेजीकारक सुब्बराव..
‘‘महागाई दरातील नरमाई आणि परराष्ट्र व्यवहार खात्यावरील तुटीची स्थिती आगामी १७ जूनच्या मध्य-तिमाही पतधोरण आढाव्याच्या बैठकीत निश्चित विचारात घेतली जाईल.’’
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी फ्रँकफर्ट येथे केलेल्या या विधानाने बाजारात हर्षोत्साही वळण देण्यात योगदान दिले.

सावधगिरी हवी..
तेजीने आता शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. बाजारात मोठय़ा प्रमाणावर होत असलेले चढ-उतार तसा संकेत देतात. निर्देशांकाने दोन दिवसांपूर्वी मागील वर्षभरातील सर्वात मोठी घसरण दाखविली तर आज वर्षभरातील सर्वात मोठी वाढ दिसली. तेजी-मंदीवाल्या मोठय़ा दलालांच्या धुमश्चक्रीत लहान गुंतवणूकदारांची फरफट होण्याची शक्यता अधिक आहे. म्हणून कल स्पष्ट होईपर्यंत लहान गुंतवणूकदारांनी बाजारापासून दूर राहणे इष्ट ठरेल, असे ‘इन्व्हेस्टर्स सायकॉलॉजी’ या विषयाच्या प्राध्यापिका डॉ. सविता जोशी यांनी सुचविले आहे. किमान अशासमयी नवीन खरेदी तरी टाळावी, असा त्यांचा सल्ला आहे.  

तज्ज्ञ काय म्हणतात?
बाजारावर तेजीवाल्यांनी आपली पकड घट्ट केली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक २०० दिवसांच्या चलत सरासरीच्या वर आहेत. ५,४७७ च्या पातळीपासून सुरू झालेल्या निफ्टीच्या तेजीने आजवर २३.६% वाढ दर्शविली आहे. ६,१८० चा अडथळा मोठा आहे. हा अडथळा पार केला तर सध्याच्या तेजीत नजीकच्या कालावधीत आणखी २००-२२५ अंशांची भर पडू शकते. बांधकाम, बँका या क्षेत्रातील निवडक कंपन्या मोठा पल्ला गाठतील.
– नमिता गोयल, संचालिका एफएनओ ट्रेड्स प्रा. लिमिटेड

जागतिक स्तरावर पुन्हा भांडवली बाजारांविषयक कलाने नाटय़पूर्ण वळण घेतले आहे. अमेरिकेचा डाऊ जोन्स, तर जपानचा निक्केई दोन्ही निर्देशांक पाच वर्षांतील उच्चांक स्तरावर आहेत. त्यातच देशांतर्गत महत्त्वाची आर्थिक आकडेवारी आपल्या बाजाराच्या पथ्यावर पडताना दिसत आहे. व्याजदर संवेदनशील बँका, बांधकाम व वाहन कंपन्यांमधील बळावलेली खरेदी ही रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपातीच्या अपेक्षेमुळे आहे. वाजवी मूल्यांकन असलेल्या आणि सशक्त आर्थिक पाया असलेल्या समभागांमध्ये चोखंदळ खरेदी अशा समयी अत्यावश्यक ठरेल.
– संजीव झारबडे, उपाध्यक्ष संशोधन विभाग, कोटक सिक्युरिटीज