भारतीय हवाई क्षेत्रात खासगी क्षेत्रातील छोटेखानी कंपनी इंडिगोचाच हिस्सा सर्वाधिक राहिला आहे. एप्रिलमधील ५३.१८ लाख प्रवासी संख्येत कंपनीने ३१.६ टक्के हिस्सा राखला आहे.
भारतीय हवाई प्रवाशांचे प्रमाण यंदाच्या एप्रिलमध्ये मार्चच्या ५२.८८ लाखांहून अधिक झाले आहे, तर जानेवारी ते एप्रिल २०१४ दरम्यान देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या २०६.९९ लाख झाली आहे.
निवडक कंपन्यांमध्ये इंडिगो पाठोपाठ २१.८ टक्क्यांसह जेट एअरवेज-जेटलाईट यांचा संयुक्त हिस्सा राहिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील एअर इंडियाचा हिस्सा १८.३ टक्के नोंदला गेला आहे.
मारन प्रवर्तित स्पाईसजेट प्रवाशी हिश्श्याबाबत चौथ्या क्रमांकावर राहिली असून तिचा हिस्सा १७.९ टक्के तर गोएअरचा हिस्सा ९.५ टक्के राहिला आहे. एअर कॉस्टाचे प्रमाण ०.८ टक्के राहिले आहे.
विदेशी गुंतवणुकीची स्पाईसजेटकडून चाचपणी
थेट विदेशी गुंतवणुकीसाठी खुल्या झालेल्या भारतीय हवाई क्षेत्रातील स्पाईसजेट कंपनी विदेशातील गुंतवणूकदारांकडून निधी उभारणीसाठी प्रयत्न करत आहे. गेल्याच आठवडय़ात तब्बल १,००० कोटी रुपयांचा तोटय़ातील ताळेबंद जाहीर करणाऱ्या या कंपनीची याबाबतची प्रक्रिया प्रगतिपथावर असल्याचा हवालाही देण्यात आला आहे. कंपनीला सध्या १,२०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. जून २०१० पूर्वी अमेरिकन गुंतवणूकदार विलबर रॉस यांची कलानिधी मारन प्रवर्तित स्पाईसजेटमध्ये ३० टक्क्यांसह गुंतवणूक होती. कंपनीने आपल्या मनुष्यबळ ताफ्यातही नव्या भरतीसह पदोन्नतीही केली आहे.