News Flash

इंडिगोद्वारे हवाई क्षेत्रातील सर्वात मोठा व्यवहार

युरोपच्या एअरबस कंपनीची एकदम २५० विमाने खरेदी करत भारतात स्वस्त हवाई सेवा पुरविणाऱ्या इंडिगोने हवाई क्षेत्रातील सर्वात मोठा व्यवहार पूर्णत्वास नेला आहे.

| October 16, 2014 03:01 am

युरोपच्या एअरबस कंपनीची एकदम २५० विमाने खरेदी करत भारतात स्वस्त हवाई सेवा पुरविणाऱ्या इंडिगोने हवाई क्षेत्रातील सर्वात मोठा व्यवहार पूर्णत्वास नेला आहे.
ए ३२०निओ जातीची विमाने प्रत्येकी १०.२८ कोटी डॉलरना खरेदीचा करार इंडिगोने पार पाडला. यामुळे ही एकूण रक्कम २५.५० अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे.
नव्या इंजिन पर्यायासह असलेल्या ए ३२०निओ विमानामुळे अन्य विमानांच्या तुलनेत १५ टक्के इंधन बचत होत असल्याचा दावा या निमित्ताने करण्यात आला आहे.
इंडिगोचे अध्यक्ष आदित्य घोष व एअरबसचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी फॅब्रिक ब्रेगिअर यांनी या करारावर फ्रान्समध्ये स्वाक्षऱ्या केल्या आहेत. इंडिगोची मुख्य प्रवर्तक इंटरग्लोब एन्टरप्राईजचे व्यवस्थापकीय संचालक राकेश गंगवाल व राहुल भाटिया हे याप्रसंगी उपस्थित होते.
इंडिगोच्या ताफ्यात एरवीही एअरबस कंपनीचीच विमाने असतात. कंपनीने यापूर्वी दोन टप्प्यांत एअरबसच्या २८० विमानांची मागणी नोंदविली आहे. इंडिगोने २००५ मध्ये एअरबसची ए ३२० १०० विमाने २००५मध्ये तर १८० विमाने २०११मध्ये खरेदी केली होती. ही रक्कम ११ अब्ज डॉलरची होती. २०११मध्येही सर्वाधिक रकमेची मागणी नोंदविलेली विमाने प्रत्यक्षात पुढील वर्षांत कंपनीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. इंडिगोचा भारतीय हवाई क्षेत्रातील हिस्सा सर्वाधिक ३२.६ टक्के आहे. ५०० उड्डाणांच्या माध्यमातून कंपनी विदेशात पाच तर भारतात ३० ठिकाणी अस्तित्व राखते.
एअरबसचे ए ३२०निओ ही विमाने बोइंगच्या ७८७ ड्रिमलायनरच्या स्पर्धेतील आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या या व्यवहाराने अमेरिकेच्या बोइंग कंपनीला धडकी भरली आहे. ड्रिमलायनरने एअर इंडिया, इतिहादच्या माध्यमातून यापूर्वीच भारतात पाऊल ठेवले आहे. येत्या २० वर्षांमध्ये भारतीय हवाई कंपन्यांकडून २ हजार विमानांची मागणी नोंदविली जाण्याची शक्यता आहे. किंगफिशर एअरलाइन्सची विमाने तूर्त जमिनीवरच खिळली असली तरी एअर एशिया इंडियाने नुकताच आपल्या व्यवसायाला प्रारंभ केला आहे. तर टाटा-सिआची उड्डाणेही लवकरच सुरू होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2014 3:01 am

Web Title: indigo to acquire 250 airbus a 320 neo jets
Next Stories
1 आयफोन ६ ‘याचि डोळा’ अनुभूती शुक्रवारीच!
2 ध्वनीलहरी लिलाव : किमतीत १० टक्क्य़ांनी वाढ
3 वैश्विक पीएफ खाते क्रमांक : पहिल्या टप्प्यात एक कोटी कर्मचाऱ्यांना लाभ
Just Now!
X