उत्पादन शुल्कातील तब्बल ५८.३ टक्के वाढीमुळे सरकारचे अप्रत्यक्ष कर संकलन यंदाच्या नोव्हेंबरमध्ये ५५,२९७ कोटी रुपयांवर गेले आहे. वार्षिक तुलनेत हे प्रमाण २४.३ टक्क्यांनी वाढले आहे.
नोव्हेंबर २०१४ मधील ४४,४७५ कोटी रुपयांपेक्षा यंदा वाढलेल्या अप्रत्यक्ष कर संकलनाने उद्योग क्षेत्रात गती नोंदली गेल्याचे मानले जात आहे. चालू आर्थिक वर्षांच्या नोव्हेंबर महिन्यात उत्पादन शुल्क २३,०३३ कोटी रुपये झाले आहे. ते वर्षभरापूर्वीच्या १४,५५१ कोटी रुपयांवरून वाढले आहे.
डिझेल तसेच पेट्रोलवरील उत्पादन शुल्क वाढ, स्वच्छ ऊर्जा अधिभार, वाहनांसाठी रद्द करण्यात आलेली कर सवलत, भांडवली वस्तू तसेच ग्राहकोपयोगी वस्तूंवर आधीच्या १२.३६ वरून १४ टक्के सेवा कर लागू केल्यामुळे यंदा कर संकलन वाढल्याचे मानले जात आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये सीमाशुल्काचे प्रमाण अवघ्या १.७ टक्क्य़ाने वाढले असून ती रक्कम १७,४७५ कोटी रुपये झाली आहे. तर सेवा कर संकलन या कालावधीत १६.१ टक्के वाढून १४,७८९ कोटी रुपये झाले आहे.
२०१५-१६ मधील एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यानचे एकूण अप्रत्यक्ष कर संकलनाची आकडेवारी नमूद नसलेल्या याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात या कालावधीत अर्थसंकल्पीय अंदाजापैकी ६७.८ टक्के कर संकलन झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
मध्यवर्ती उत्पादन शुल्क, सीमाशुल्क तसेच सेवा कर यांचा समावेश असलेल्या अप्रत्यक्ष कराचे सरकारचे लक्ष्य ६.४६ टक्केआहे.