काश्मिरी विद्यार्थ्यांंना ज्ञानदान करण्यासाठी इंद्राणी बालन फाउंडेशनने ‘नेशन फर्स्ट’ उपक्रमाद्वारे पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्करातर्फे चालविण्यात येणाऱ्या पाच गुडविल शाळांना मदत करण्यात येणार आहे.

भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्स मुख्यालय येथे फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन आणि चिनार कॉर्प्स मुख्यालयाचे प्रमुख कमांडर लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांनी करारावर स्वाक्षरी केली. फाउंडेशनच्या उपाध्यक्षा जान्हवी धारिवाल या प्रसंगी उपस्थित होत्या. या करारातंर्गत फाउंडेशन उरी, वायन, तरेहगाम आणि हाजीनार या ठिकाणच्या गुडविल शाळा, तसेच बारामुल्ला येथे विशेष मुलांसाठी असलेल्या परिवार स्कूलला तांत्रिक, शैक्षणिक आणि आर्थिक मदत करणार आहे. बी. एस. राजू म्हणाले, लष्करातर्फे जम्मू – काश्मीर मध्ये ४४ गुडविल शाळा चालविण्यात येतात. त्यापैकी २८ शाळा काश्मीर खोऱ्यात आहेत. या शाळांमधून एक लाखाहून अधिक स्थानिक विद्याार्थी उतीर्ण झाले असून सध्या दहा हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इंद्राणी बालन फाउंडेशनचा हा उपक्रम काश्मीरच्या उभारणीत मोलाचा हातभार लावेल. बालन म्हणाले, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांंमध्ये गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. काश्मिरी मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. भविष्यात उपक्रम राबविण्यात येणार आहेत.