26 February 2021

News Flash

ठाण्यात औद्योगिक परिषद, प्रदर्शनाचे आयोजन

ठाणे शहरात औद्योगिक प्रदर्शन व परिषद भरविण्यात येणार असून येत्या १५ ते १७ जानेवारी या कालावधीत होणार आहे.

उद्योग आधार नोंदणीचे आवाहन

विविध शासकीय खात्यांना आणि सार्वजनिक उपक्रमांना लागणाऱ्या २० टक्के वस्तूंची खरेदी लघुउद्योगांकडून करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या उपक्रमांना वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी लघू उद्योजकांना नोंदणी करणे गरजेचे आहे. परंतु अनेक उद्योजकांनी अशा प्रकारची नोंदणी केलेली नसल्यामुळे त्यांना वस्तुंचा पुरवठा करणे शक्य होणार नाही. यामुळे या औद्योगिक प्रदर्शनाच्या निमित्ताने लघुत्तम व लघू उद्योजकांना उद्योग आधारमध्ये नोंदणी करण्याची मोफत सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी पॅनकार्ड, बँक खात्याची माहिती व उद्योगाचे अहवाल इत्यादी कागदपत्रे सोबत घेऊन यावीत, असे आवाहन पुरुषोत्तम अगवण यांनी केले.

केंद्र शासनाची सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग विकास संस्था आणि चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोशिएशन (कोसिआ) यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरात ‘व्हेन्डेक्स – २०१६’ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये औद्योगिक प्रदर्शन व परिषद भरविण्यात येणार असून त्यामध्ये केंद्र शासनाचे सार्वजनिक उपक्रम तसेच मुंबई व ठाणे जिल्ह्य़ातील सुमारे शंभरहुन अधिक लघु उद्योजक सहभागी होणार आहेत. तसेच ठाणे शहरात पहिल्यांदाच होणाऱ्या औद्योगिक प्रदर्शनाच्या निमित्ताने लघुत्तम व लघु उद्योजकांना उद्योग आधारमध्ये मोफत नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ठाणे शहरातील गावदेवी मैदानात औद्योगिक प्रदर्शन व परिषद भरविण्यात येणार असून येत्या १५ ते १७ जानेवारी या कालावधीत होणार आहे. या प्रदर्शनात केंद्र शासनातर्फे पश्चिम रेल्वे, माझगाव डॉक, कोकण रेल्वे, एचपीसीएल, आयडीईएमआय-मुंबई, इन्डो जर्मन टुल रुम-औरंगाबाद, कॉयर बोर्ड-मुंबई, खादी ग्रामोद्योग-मुंबई, सिडवी-मुंबई, एनएसआयसी-मुंबई आणि अन्य उपक्रम सहभागी होणार आहेत. याशिवाय, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पालघर, कल्याण, अंबरनाथ, डोंबिवली, वसई, तळोजा आदी भागातील १००हून अधिक उद्योजक सहभागी होणार आहेत.

लघुत्तम व लघू उद्योजकांना कामे मिळावीत आणि त्यातून त्यांचा उद्योग वाढीस लागावा, या उद्देशातून हे परिषद व प्रदर्शन भरविण्यात आले आहे, अशी माहीती कोसिआचे निनाद जयवंत यांनी दिली. प्रदर्शनासोबत होणाऱ्या औद्योगिक परिषदेमध्ये लघुउद्योजकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या परिषदेत पुरवठादारांची नोंदणी पद्धती व त्या संदर्भातील शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच लघू उद्योगांच्या शक्तीवर्धनार्थ संशोधन, शून्य दोष प्रमाणीकरण, पर्यावरणाशी संबंधित विविध बाबींचे पूर्तता या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय, उद्योगाचे सुलभीकरण या योजनेंतर्गत वस्तू व सेवा कर (जीएसटी), कामगार कायदेविषयक सुधारणा आणि उद्योगासाठीचा कर्जपुरवठा अशा विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत, अशी माहीती कोसीआचे उपाध्यक्ष पुरषोत्तम अगवण यांनी दिली. या चर्चासत्रामध्ये सिडबीचे के.जी. अलई, मुंबई आयआयटीचे मिलींद अत्रे, क्लस्टर प्लसचे संस्थापक जगत शहा, जर्मनीतील झिझचे व्यवस्थापक अमितकुमार, पुणे एनसीएलचे डॉ. खारूल, दिल्लीतील क्यूसीआयचे एस.के. वर्मा, महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालक जे.एम.मोतघरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे सचिव सदस्य डॉ. पी.अनबलगन आदी तज्ज्ञांचे या निमित्ताने मार्गदर्शन होईल.

याशिवाय, ठाणे जिल्हा उद्योग केंद्र आणि मुंबई विभागाची सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विकास संस्थान या संस्थेच्या शासकीय अधिकाऱ्यांचा गटही लघुउद्योजकांच्या विशेष सहकार्यासाठी उपलब्ध असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2016 3:08 am

Web Title: industrial council in thane
टॅग : Thane
Next Stories
1 सम-विषम वाहन योजनेकरिता पूरक पायाभूत सुविधा हव्यात -रतन टाटा
2 सूट-सवलतींची खरेदी! डिसेंबर २०१५ चा प्रवास
3 म्युच्युअल फंडांच्या रोखे गुंतवणुकीवर मर्यादा
Just Now!
X