करोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावाचा पुणे आणि परिसरातील कंपन्यांच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये कंपन्यांच्या उत्पादनामध्ये दोन टक्के  घट झाल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अँड अ‍ॅग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) सर्वेक्षण मालिकेतील १२व्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष गुरुवारी जाहीर करण्यात आले. या सर्वेक्षणात पुणे आणि परिसरातील एकूण १०० कंपन्यांनी सहभाग घेतला. फेब्रुवारीच्या सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार कंपन्यांचे उत्पादन ८५ टक्क्यांपर्यंत वाढले होते, तर मार्चमध्ये ते ८३ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. बहुतेक कंपन्यांनी मार्चमधील कार्यरत मनुष्यबळ ८६ टक्के , म्हणजे फेब्रुवारीइतकेच असल्याची माहिती दिली. गेल्या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्चमध्ये लागू के लेली टाळेबंदी हटवण्यात आल्यानंतर कच्च्या मालाच्या अनियमित पुरवठ्यासह विविध अचडणींना तोंड देऊनही कं पन्यांच्या उत्पादनात  दर महिन्याला टप्प्याटप्प्याने वाढ होत असल्याचे दिसून येत होते. तसेच कार्यरत मनुष्यबळाचे प्रमाणही वाढत होते. मात्र गेल्या महिन्याभरात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने उत्पादनावर परिणाम झाल्याचे मार्चमधील सर्वेक्षणाच्या निष्कर्षांतून अधोरेखित होत आहे.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांपैकी ४८ टक्के  कंपन्यांनी करोनापूर्व काळातील उत्पादन पातळी गाठली होती. मार्चमध्ये ५१ टक्के  कंपन्यांनी करोनापूर्व काळातील उत्पादन पातळी गाठल्याची माहिती होती.  करोनापूर्व काळातील उत्पादन पातळी गाठण्यासाठी १९ टक्के  कंपन्यांना आणखी तीन महिने, १६ टक्के  कंपन्यांना तीन ते सहा महिने लागतील असे वाटते. तर १७ टक्के  कंपन्यांनी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागण्याचा अंदाज व्यक्त केला. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांमध्ये ६७ टक्के  कंपन्या उत्पादन क्षेत्रातील आहेत, तर १४ टक्के  कंपन्या सेवा क्षेत्रातील आणि उर्वरित उत्पादन, सेवा या दोन्ही क्षेत्रातील आहेत.

लसीकरणाला गतीमुळे कंपन्यांच्या आत्मविश्वासासह उत्पादनातही वाढ होईल. देशाच्या आर्थिक पुनरुत्थानामध्ये सेवा क्षेत्रही योगदान देऊ लागेल. मराठा चेंबर प्रणीत पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोव्हिड रिस्पॉन्सच्या माध्यमातून करोना प्रतिबंधक उपायांचा प्रचार करण्यासह दररोज एक लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी आवश्यक ती सर्व पावले टाकण्यात येत आहेत.

–   सुधीर मेहता, अध्यक्ष, एमसीसीआयए

एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणांमधून दर महिन्याला उद्योगांच्या उत्पादनात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले. मात्र मार्चमध्ये पहिल्यांदाच थोडी घट दिसली आहे. छोट्या कंपन्यांच्या सुधारणेचा वेग कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सूक्ष्म आणि लघु उद्योगांकडे सरकारने अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

–   प्रशांत गिरबने, महासंचालक, एमसीसीआए