मार्चपासून देशातील सर्वच उद्योग क्षेत्रांत उत्पादन जवळपास पूर्णपणे ठप्प राहिले, तरी करोना विषाणूबाधेने देश ग्रासला जाण्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात उद्योग क्षेत्राची कामगिरी तुलनेने उत्साहवर्धक राहिली आहे. या महिन्याच्या औद्योगिक उत्पादन दरात ४.५ टक्क्यांनी वाढ दिसून आली. मुख्यत: खाणकाम, निर्मिती तसेच वीजनिर्मिती क्षेत्रातून चांगल्या उत्पादनाचा हा परिणाम दिसून आला.

उल्लेखनीय म्हणजे गतवर्षी म्हणजे फेब्रुवारी २०१९ मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक हा अवघा ०.२ टक्क्यांवर होता. गुरुवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, निर्मिती क्षेत्राने फेब्रुवारीत ३.२ टक्के वाढ दर्शविली, जी गतवर्षी याच महिन्यात ०.३ टक्के इतकी होती.

वीजनिर्मिती क्षेत्रातून ८.१ टक्के वाढीसह फेब्रुवारीत उत्पादन घेतले गेले, ज्याचे प्रमाण फेब्रुवारी २०१९ मध्ये १.३ टक्के असे होते. खाणकाम क्षेत्रातून मागील वर्षांतील २.२ टक्क्यांच्या तुलनेत यंदाच्या फेब्रुवारीत १० टक्के वाढीने उत्पादन घेण्यात आले.

एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० असे अकरा महिन्यांत औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा ०.९ टक्क्यांनी संकोच झाला आहे. करोनामुळे सुरू झालेली टाळेबंदी पाहता मार्च २०२०ची आकडेवारीही निराशाजनक, किंबहुना उणे पातळीवर घसरणे क्रमप्राप्त आहे. २०१८-१९ या संपूर्ण आर्थिक वर्षांत हा निर्देशांक चार टक्क्यांनी वधारला होता.