ढासळत्या अर्थव्यवस्थेला दिलासादायी क्षण

सलग तीन महिन्यांच्या घसरणीनंतर नोव्हेंबर २०१९ मधील औद्योगिक उत्पादन वाढीचा दर वधारला आहे. मंदीने बेजार अर्थव्यवस्थेत सुधारणेचे संकेत देणारा हा महत्वाचा दिलासा आहे. निर्मिती क्षेत्राच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे औद्योगिक उत्पादन निर्देशांक या महिन्यात १.८ टक्के नोंदला गेला आहे.

वर्षभरापूर्वी म्हणजे नोव्हेंबर २०१८ मध्ये औद्योगिक उत्पादन दर शून्यानजीक (०.२ टक्के) होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या नोव्हेंबरमध्ये निर्मिती क्षेत्राची वाढ वर्षभरापूर्वीच्या ०.७ टक्क्यांच्या तुलनेत चांगली वाढून २.७ टक्क्यांपर्यंत गेली आहे.

वीजनिर्मिती तसेच कोळसा व पोलाद उत्पादन मात्र यंदा घसरले आहे. या दोन्ही क्षेत्रांचा प्रवास सरलेल्या नोव्हेंबरमध्ये अनुक्रमे उणे ५ व १.७ टक्के असा राहिला आहे. वर्षभरापूर्वी वीजनिर्मिती क्षेत्राने ५.१ टक्के तर कोळसा उत्पादनाने २.७ टक्के वाढ दर्शविली होती.

मागील काही महिन्यांमध्ये सातत्याने खराब कामगिरी राहिल्यामुळे, चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांदरम्यान औद्योगिक उत्पादन दर ०.६ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत तो ५ टक्क्यांपुढे होता.