चालू आर्थिक वर्षांतील पहिल्याच महिन्यात देशातील औद्योगिक उत्पादन दर उंचावले आहे. एप्रिलमधील ४.१ टक्के हा दर गेल्या दोन महिन्यातील उच्चांक ठरला आहे. भांडवली वस्तूचा प्रवास मंदावूनदेखील निर्मिती क्षेत्राने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे हे शक्य झाले आहे.
औद्योगिक उत्पादन निर्देशांकार आधारित हा दर वर्षभरापूर्वी, एप्रिल २०१४ मध्ये ३.७ टक्के होता. तर मार्च २०१५ मध्ये तो २.५ टक्के असा सुधारित राहिला आहे. निर्देशांकात ७५ टक्के हिस्सा राखणाऱ्या निर्मिती क्षेत्राची वाटचाल यंदा ५.१ टक्के राहिली आहे.
भांडवली वस्तूंचे उत्पादन कमी मागणीअभावी वर्षभरापूर्वीच्या १३.४ टक्क्यांवरून यंदाच्या एप्रिलमध्ये ११.१ टक्क्यांवर आले आहे. खनिकर्म क्षेत्राची वाढही एप्रिल २०१४ च्या तुलनेत यंदाच्या एप्रिलमध्ये शून्यात, ०.६ टक्के राहिली आहे.
त्याचबरोबर ऊर्जा उत्पादनही शून्यावर आले आहे. वर्षभरापूर्वीच्या ११.९ टक्क्यांवरून ते यंदा थेट ०.५ टक्क्यावर राहिले आहे. यंत्र व उपकरणनिर्मिती क्षेत्राची वाढ मात्र १६.२ टक्क्यांवरून २०.६ टक्क्यांवर गेली आहे.