अर्थव्यवस्थेत अद्याप अपेक्षित सुधार नसल्याचे शुक्रवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. जुलैमधील औद्योगिक उत्पादन दर ०.५ टक्क्यांवर आला असून हे प्रमाण गेल्या चार महिन्यांतील किमान स्तरावर आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंना अद्याप हवी तशी मागणी नसल्याने मंदावलेल्या निर्माण क्षेत्राची जुलैमध्ये घसरलेल्या औद्योगिक उत्पादन दरात पडछाया दिसून आली.
वर्षभरापूर्वी, जुलै २०१३ मध्ये औद्योगिक उत्पादन २.६ टक्के होता. तर जूनमधील दर आधीच्या ३.४ टक्क्यांवरून आता ३.९ टक्के सुधारित करण्यात आला आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जुलै या चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या चार महिन्यांतील औद्योगिक उत्पादन दर ३.३ टक्के झाला आहे. वर्षभरापूर्वी याच दरम्यान हा दर ०.१ टक्के होता. तुलनेने ही सुधारणा असली तरी उत्साहदायी मात्र नाही.
चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत निर्मिती क्षेत्र १ टक्क्यावर घसरले आहे. एकूण औद्योगिक उत्पादनात ७५ टक्के हिस्सा राखणारे हे क्षेत्र एप्रिल ते जुलैदरम्यान २.३ टक्क्याने विस्तारले आहे. जुलैमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादन ७.४ टक्क्यांनी घसरले आहे. तर पहिल्या चार महिन्यांत ते ४.५ टक्क्यांनी रोडावले आहे.
विद्युत उपकरण क्षेत्राने जुलैमध्ये दुहेरी आकडय़ातील घट नोंदविली आहे. यादरम्यान या क्षेत्रात २०.९ टक्के घसरण झाली. जुलै २०१३ मध्ये हे क्षेत्र एकेरी आकडय़ात, ९.६ टक्क्यांनी घसरले होते. तर एप्रिल-जुलैदरम्यान या क्षेत्राचा प्रवास १२.५ टक्के असा नकारात्मक नोंदला गेला आहे. तो वर्षभरापूर्वी ११.९ टक्क्यांनी उलटा नोंदला गेला होता.
औद्योगिक उत्पादनात गणले जाणाऱ्या एकूण २२ क्षेत्रांपैकी १२ क्षेत्रे ही जुलैमध्ये वधारली आहेत.
भांडवली वस्तूंची निर्मिती यंदाच्या जुलैमध्ये ३.८ टक्क्यांनी कमी झाली आहे. जुलै २०१३ मध्ये ती १५.९ टक्क्यांनी वधारली होती. एप्रिल-जुलैदरम्यान ती ८.५ टक्क्यांनी वधारली आहे. जुलै २०१४ मध्ये खनिकर्म क्षेत्राची हालचाल २.१ टक्क्यांनी वाढली आहे.
उलट पहिल्या चार महिन्यांमध्ये ती ३ टक्क्यांनी मंदावली आहे. वर्षभरापूर्वी ५.२ टक्के वाढ राखणारी ऊर्जानिर्मिती यंदा दुप्पट झाली असून ती  ११.७ टक्क्यांनी वधारली आहे. तर पहिल्या चार महिन्यांत ती ३.९ टक्क्यांवरून जवळपास चौपट, ११.४ टक्के झाली आहे.
महागाई दर ‘किरकोळ’ सावरला
*भाज्या तसेच इंधनाचे दर कमी झाल्याने गेल्या महिन्यातील किरकोळ महागाई दर काहीसा विसावला आहे. ऑगस्टमधील ग्राहक किंमत निर्देशांक ७.८० टक्क्यांवर आला आहे. जुलैमध्ये हा दर ७.९६ टक्के, तर ऑगस्ट २०१३ मध्ये तो ९.५२ टक्के होता. रिझव्र्ह बँकेला चिंता असणारा अन्नधान्य दर मात्र अद्यापही चढाच असून ऑगस्टमध्ये हा दर जुलैच्या ९.३६ टक्क्यांच्या तुलनेत ९.४२ टक्क्यांपर्यंत गेला आहे. यामध्ये भाज्यांच्या किमती १५.१५ टक्के झाल्या आहेत. ऑगस्टमधील १६.८८ टक्क्यांपेक्षा दर कमी आहे. त्याचबरोबर ४.१५ टक्क्यांनी कमी झालेल्या इंधनाच्या दरांनीही घसरत्या किरकोळ महागाईला साथ दिली आहे. गेल्या महिन्यात फळांच्या किमती मात्र २४.२७ टक्क्यांनी उंचावल्या आहेत. तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थाचे दरही ११.७० टक्क्यांपर्यंत वधारले आहेत. या कालावधीत डाळीही ६.८८ टक्क्यांनी महागल्या. अंडी, मासे, मटण हे मांसाहारी पदार्थही ७.७१ टक्क्यांनी महाग झाले.