सकारात्मक अर्थ-निदर्शक आकडय़ांमधून सरकारला दिलासा

अर्थव्यवस्था वाढीच्या मंदावलेल्या  दरामुळे सरकारवर टीका सुरू असतानाच गुरुवारी आर्थिक सुस्थितीसंबंधी सकारात्मक आकडे समोर आले. या आकडय़ांमधून ऑगस्टमधील देशाचा औद्योगिक उत्पादन दर ४.३ टक्के असा नऊ महिन्यांच्या वरच्या टप्प्याला पोहोचल्याचे, तर सप्टेंबरमधील किरकोळ महागाईचा दर ४ टक्क्यांच्या खाली येत ३.२८ टक्के नोंदला गेल्याचे स्पष्ट झाले.

एप्रिल ते जून या २०१७-१८ वित्त वर्षांच्या पहिल्या तिमाहीत आर्थिक विकास दर ५.७ टक्के असा गेल्या तीन वर्षांच्या तळात विसावला आहे. त्यातच चालू एकूण आर्थिक वर्षांसाठीचा विकास दराचा अंदाज जागतिक स्तरावरील आघाडीच्या बँका, वित्त तसेच पतमानांकन संस्थांनी खाली आणला आहे.

औद्योगिक उत्पादकतेचा नऊमाही उच्चांक

सणापूर्वीची मागणी वाढल्याने ऑगस्टमधील औद्योगिक उत्पादन ४.३ टक्क्यांवर पोहोचले आहे. खनिकर्म, ऊर्जा, भांडवली वस्तू क्षेत्राच्या जोरावर उत्पादन दर नऊ महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचले आहे.

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, वर्षभरापूर्वी औद्योगिक उत्पादन निर्देशांक ४ टक्के होता. तर यापूर्वीचा सर्वाधिक दर नोव्हेंबर २०१६ मध्ये ५.७ टक्के होता. एप्रिल ते ऑगस्टदरम्यान औद्योगिक उत्पादन दर मात्र घसरत २.२ टक्के राहिला आहे.

औद्योगिक उत्पादन निर्देशांकात निर्मिती क्षेत्र ७७.६३ टक्के हिस्सा राखते. या गटातील खनिकर्म व ऊर्जानिर्मिती ऑगस्टमध्ये अनुक्रमे ९.४ व ८.३ टक्के दराने वाढली आहे. तर भांडवली वस्तू व ग्राहकोपयोगी वस्तू अनुक्रमे ५.४ व १.६ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. २३ पैकी १० क्षेत्रांचा वेग यंदा वाढला आहे.

भाज्या, मसाले स्वस्त झाल्याने महागाईत उतार

भाज्या तसेच मसाल्यांच्या किमती कमी झाल्याने सप्टेंबरमध्ये महागाई दर ४ टक्क्यांखाली आला आहे. किरकोळ महागाई निर्देशांक सप्टेंबरमध्ये ३.२८ टक्के नोंदला गेला आहे. वर्षभरापूर्वी तो ४.३९ टक्के होता. सप्टेंबरमध्ये अन्नधान्याचा महागाई दरही आधीच्या १.६७ टक्क्यांवरून १.२५ टक्क्यांपर्यंत स्थिरावला आहे. यंदा भाज्यांच्या किमती ३.९२ टक्क्यांपर्यंत कमी झाल्या आहेत. तर इंधन व ऊर्जेचे दर ५.५६ टक्क्यांपर्यंत रोडावले आहेत. अन्नधान्यामध्ये फळे, मटण व मासे यांच्या किमती गेल्या महिन्यात सावरल्या आहेत. तर डाळींच्या किमती अद्यापही उणे स्थितीत आहेत. यंदा त्या (-) २२.५१ पर्यंत राहिल्या आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेने चालू वित्त वर्षांसाठी अंदाज वाढवत तो ४.२ ते ४.६ टक्के असेल असे भाकीत केले आहे.