चार महिन्यांच्या तळापर्यंत बिकट वाट

निश्चलनीकरणाचा फटका बसल्याने डिसेंबरमधील औद्योगिक उत्पादन दर ०.४ टक्के असा उणे स्थितीत घरंगळला आहे. वर्षभरानंतरही त्याचा उणे प्रवास कायम राहताना तो आता गेल्या चार महिन्यांच्या खोलात गेला आहे.
निर्मिती क्षेत्रातील सुमार कामगिरीचा विपरीत परिणाम एकूण औद्योगिक उत्पादन दरावर झाला आहे. डिसेंबरमधील निश्चलनीकरणामुळे ही प्रतिक्रिया नोंदली गेली आहे. निश्चलनीकरणाच्या पहिल्या टप्प्या दरम्यान, नोव्हेंबर २०१६ मध्ये औद्योगिक उत्पादन दर ५.७ टक्के असे वर्षभराच्या वरच्या स्तरावर होते. मात्र दुसऱ्या टप्प्यात, डिसेंबरमध्ये हा दर वर्षभरापूर्वीच्या, डिसेंबर २०१५ मधील ०.९ टक्क्यांहूनही खाली गेला आहे. गेल्या वर्षभरात सात वेळा हा दर उणे स्थितीत राहिला आहे. यापूर्वी ऑगस्ट २०१६ मध्ये हा दर ०.७ टक्के असा किमान नोंदला गेला आहे.
औद्योगिक उत्पादन दरावर अधिक परिणाम करणाऱ्या निर्मिती क्षेत्राची कामगिरी डिसेंबर २०१६ मधील उणे १.९ टक्क्यांच्या तुलनेत आणखी घसरून उणे २ टक्के झाली आहे. तर एप्रिल ते डिसेंबर २०१६ या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये या क्षेत्राची कामगिरी वर्षभरापूर्वीच्या ३.२ टक्क्यांवरून उणे ०.५ टक्क्यांपर्यंत सुमार ठरली आहे. ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या दरम्यान देशात निश्चलनीकरणाची प्रक्रिया राबविली गेली. यामुळे रोजगारासह निर्मितीतही या दरम्यान खंड पडल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. एकूण औद्योगिक उत्पादन दर एप्रिल ते डिसेंबर २०१६ दरम्यान वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील ३.२ टक्क्यांच्या तुलनेत यंदा ०.३ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.
ग्राहकोपयोगी वस्तूंची निर्मितीही डिसेंबर २०१६ मध्ये १०.३ टक्क्यांनी घसरली आहे. वर्षभरापूर्वी या क्षेत्राची वाढ तब्बल १६.६ टक्के होती. भांडवली वस्तू क्षेत्रही डिसेंबर २०१६च्या १८.६ टक्क्यांवरून यंदा ३ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. ऊर्जानिर्मिती क्षेत्राने मात्र यंदा दुप्पट, ६.३ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदविली आहे. वर्षभरापूर्वी ऊर्जानिर्मिती वेग ३.२ टक्के होता. तर खनिकर्म क्षेत्रही २.८ टक्क्यांवरून ५.२ टक्क्यांपर्यंत विस्तारले आहे. औद्योगिक उत्पादनात वाटेकरी असलेल्या एकूण २२ उद्योगांपैकी १७ उद्योगांची कामगिरी २०१६च्या शेवटच्या महिन्यात नकारात्मक राहिली आहे.