21 January 2019

News Flash

औद्योगिक उत्पादन १९ महिन्यांच्या उच्चांकावर

नोव्हेंबर २०१६ मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक ५.१ टक्के नोंदले गेले होते

प्रतिनिधिक छायाचित्र

निर्मिती क्षेत्राच्या जोरावर नोव्हेंबरमध्ये दमदार कामगिरी

निर्मिती क्षेत्राच्या जोरावर देशातील औद्योगिक उत्पादन गेल्या दीड वर्षांहून अधिकच्या टप्प्यावर पोहोचले आहे. औद्योगिक उत्पादन दर नोव्हेंबरमध्ये ८.४ टक्के असा गेल्या १९ महिन्यांतील सर्वोत्तम नोंदला गेला आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेवर संथ गतीचे मळभ असतानाच निर्मिती, ऊर्जा, खनिकर्म, भांडवली वस्तू तसेच पायाभूत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर यंदा औद्योगिक उत्पादनाला झेप घेता आली आहे.

एकूण औद्योगिक उत्पादन निर्देशांकात ७७.६३ टक्के हिस्सा राखणाऱ्या निर्मिती क्षेत्राची वाढ यंदाच्या नोव्हेंबरमध्ये १०.२ टक्के राहिली आहे. आधीच्या, ऑक्टोबरमध्ये हा निर्देशांक २.५ टक्के होता. तर वर्षभरापूर्वी तो अवघा ४ टक्के होता.

खनिकर्म क्षेत्राची वाढ यंदा १.१ टक्के राहिली आहे. ऊर्जानिर्मिती क्षेत्राची वाढ यंदा ३.९ टक्के नोंदली गेली आहे. त्याचबरोबर भांडवली वस्तू क्षेत्राची वाढ ९.४ टक्के राहिली आहे. पायाभूत व बांधकाम क्षेत्राची वाढ अनुक्रमे दुहेरी अंकापर्यंत, १३.५ टक्के गेली आहे. औषधनिर्माण, वैद्यकीय रसायन तसेच जैव उत्पादन निर्मितीत थेट ३९.५ टक्के वाढ नोंदली गेली आहे. तर संगणक, विद्युत उपकरण निर्मिती क्षेत्राची झेप २२.६ टक्क्यांपर्यंत गेली आहे.

नोव्हेंबर २०१६ मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक ५.१ टक्के नोंदले गेले होते. तर आधीच्या ऑक्टोबरमध्ये तो २ टक्के होता. अर्थप्रगतीचा हा निर्देशांक यापूर्वी जून २०१६ मध्ये ८.९ टक्के असा सर्वोच्च होता.

निर्मिती क्षेत्रातील २३ पैकी १५ उद्योग क्षेत्रांची कामगिरी नोव्हेंबर २०१७ मध्ये सकारात्मक राहिली आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने चालू आर्थिक वर्षांकरिता सकल राष्ट्रीय उत्पादन ६.५ टक्के असे कमी अंदाजित केले आहे. गेल्या आर्थिक वर्षांत भारताचा विकास दर ७.१ टक्के नोंदला गेला होता.

First Published on January 13, 2018 5:51 am

Web Title: industrial production rises to 19 month high