करोना कहराने अर्थव्यवस्थेचा पाठलाग कायम असून, ऑगस्टमधील उणे आठ टक्क्य़ांवर गडगडलेला औद्योगिक उत्पादन दर आणि जनसामान्यांच्या खिशाला भार ठरणाऱ्या किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराच्या सप्टेंबरमधील ७.३४ टक्क्य़ांवरील भडक्याच्या सोमवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीने याचा प्रत्यय दिला.

मुख्यत: करोना टाळेबंदीमुळे वस्तू निर्मिती क्षेत्र, खाणकाम आणि वीज निर्मिती क्षेत्राचे अडखळलेले चक्र हे ऑगस्टमधील औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील आठ टक्क्य़ांच्या भीषण घसरणीस कारणीभूत ठरले आहे. या निर्देशांकानुसार, निर्मिती क्षेत्राची ऑगस्ट २०१९ च्या तुलनेत घसरण ८.६ टक्के, तर खाणकाम व वीज निर्मिती क्षेत्राची घसरण ही अनुक्रमे ९.८ टक्के आणि १.८ टक्के अशी आहे. उल्लेखनीय म्हणजे ऑगस्ट २०१९ मध्येही औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची स्थिती उणे १.४ टक्के अशी दारुण होती.

ही आकडेवारी जाहीर करणाऱ्या सांख्यिकी आणि योजना अंमलबजावणी मंत्रालयाने दिलेल्या स्पष्टीकरणात, करोना आजारसाथीच्या काळात औद्योगिक उत्पादनाच्या कामगिरीची, करोनापूर्वीच्या काळाशी तुलना करणे समर्पक ठरणार नाही असे म्हटले आहे. या मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात, करोना टाळेबंदी आणि निर्बंधात टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली जात असून, त्याचे सुपरिणामही दिसत आहेत अशी पुस्तीही जोडली आहे. अर्थचक्र वेगवेगळ्या प्रमाणात सुधार दर्शवत असून, त्याचे प्रतिबिंब वेळोवेळी जाहीर होणाऱ्या आकडेवारीत उमटतानाही दिसत असल्याचा त्यांचा दावा आहे.

सरलेल्या सप्टेंबरमध्ये किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ७.३४ टक्क्य़ांवर नोंदविण्यात आला. चालू वर्षांतील जानेवारीनंतरच्या आठ महिन्यांतील हा महागाईदराचा सर्वोच्च भडका आहे. ऑगस्टमध्ये हा महागाई दर ६.६९ टक्के नोंदविला गेला होता.

प्रामुख्याने सर्वसामान्यांच्या नित्य आहाराचा भाग असलेल्या अन्नधान्याची महागाई १०.६८ टक्के कडाडल्याचा एकूण महागाई निर्देशांकात वाढीचा परिणाम साधला आहे. भाज्या, डाळी, मांस, अंडी आणि मासे या सर्वाच्या किमती या जानेवारी २०२० पासून सर्वोच्च स्तरावर असल्याचे ही सांख्यिकी मंत्रालयाकडून प्रसिद्ध झालेली आकडेवारी स्पष्ट करते. अन्नधान्य आणि इंधन हे घटक वगळता किरकोळ महागाई निर्देशांक हा ५.३६ टक्क्य़ांवर, म्हणजे आधीच्या ऑगस्ट महिन्यातील ५.४४ टक्के पातळीपेक्षा प्रत्यक्षात खाली घसरला आहे.

परिणाम काय?

गेल्या काही महिन्यांतील महागाईतील भडक्याचा परिणाम म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेने पतधोरणाच्या द्विमासिक आढाव्याच्या सलग दुसऱ्या बैठकीत व्याजाचे दर ‘जैसे थे’ ठेवले आहेत. किरकोळ किमतीवर आधारित महागाई दरच मध्यवर्ती बँक विचारात घेत असते आणि हा दर चार टक्के (उणे-अधिक दोन टक्के) पातळीच्या मर्यादेत राहणे तिच्या दृष्टीने समाधानाचे असते.