अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न कायम राहील, या पंतप्रधानांच्या आश्वासनावर ‘पंतप्रधानांनी आधी महागाईवर नियंत्रण मिळवावे’, असा सल्ला उद्योग क्षेत्रातून शुक्रवारी दिला गेला. अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी अधिक गतीने पावले उचलण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अर्थव्यवस्था व एकूण राजकीय भाष्याबाबत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केलेल्या निवेदनावर उद्योगजगतातून नाराजीची प्रतिक्रिया उमटली आहे. उद्योगवाढीसाठी सरकारच्या सहकार्याची अपेक्षा केली गेली आहे.
ल्ल देशातील निर्मिती क्षेत्राने अद्यापही तेजीचा फेरा घेतलेला नाही, या पंतप्रधानांच्या विधानाशी आम्ही सहमत आहोत. त्याचबरोबर महागाई तूर्त चढीच आहे, हेही मान्य आहे. मात्र त्यासाठी सरकारने अधिक वेगाने पावले उचलणे अपेक्षित आहे. अन्नधान्याची महागाई थोपविण्यासाठी वस्तूंचा सुरळीत पुरवठा, सक्षम विपणन व्यवस्था, सुदृढ वाहतूक सेवा यांची गरज आहे.
चंद्रजीत बॅनर्जी, ‘सीआयआय’चे महासंचालक
पंतप्रधानांनी आपल्या संवादात रोजगारवाढीचा उल्लेख केला आहे. अर्थव्यवस्थेत गेल्या काही महिन्यांमध्ये पुरेशी रोजगारनिर्मिती झाली नाही, हे कबूल. मात्र एकूणच उद्योग क्षेत्राच्या स्थितीकडेही बघायला हवे. विकासाशिवाय रोजगारवाढही शक्य नाही, हेही लक्षात ठेवायला हवे.
सिद्धार्थ बिर्ला, ‘फिक्की’चे अध्यक्ष.
केवळ निर्मिती क्षेत्रातून रोजगारवाढीला चालना मिळेल. या क्षेत्राला बळकटी मिळण्यासाठी आवश्यक धोरणांची कमतरताही आहे. लघु व मध्यम उद्योग क्षेत्रांकडून मोठय़ा प्रमाणात रोजगारवाढ रोखली गेली. तिला प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. सरकारकडून या क्षेत्रासाठी अधिक कर्तव्याची गरज आहे.
राणा कपूर, ‘असोचेम’चे अध्यक्ष.