रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २०१५-१६ सालासाठी मांडलेल्या रेल्वे अर्थसंकल्पाचे वस्तुनिष्ठ, व्यवहार्य असे e02वर्णन करीत खासगी क्षेत्राला अधिकाधिक वाव निर्माण करणाऱ्या या अर्थसंकल्पाचे उद्योग क्षेत्राने सहर्ष स्वागत केले.
‘प्रभु’ अजि गमला…
रेल्वेची कार्यक्षमता उंचावण्याबरोबरच, देशात आवश्यक उद्योग-व्यवसाय करण्यास अनुकूल वातावरणनिर्मिती केली जाईल, याचीही अर्थसंकल्पाने काळजी घेतली आहे.

विविध प्रतिक्रिया..
खासगी क्षेत्राला मोठा वाव
स्थानकांचे नविनीकरण, आवर्ती सामग्री आणि ठोक स्वरूपात मालवाहतूक यात खासगी क्षेत्राला अधिकाधिक वाव मिळवून दिल्याचा रेल्वेची एकूण कार्यक्षमता सुधारणारा दीघरेद्देशी परिणाम दिसेल. प्रवासी तसेच मालवाहतूक गाडय़ांच्या गतीत वाढ होण्याचा व्यवसायानुकूलतेच्या दृष्टीने चांगला परिणाम दिसून येईल.
-राणा कपूर, अध्यक्ष, अॅसोचॅम

महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प मार्गी लागतील
भारतीय रेल्वे वित्त मंडळ (आयआरएफसी) अथवा भारतीय रेल विकास निगम लि. या बिगरबँकिंग वित्त कंपन्यांबरोबर संयुक्त भागीदारी, तसेच होल्डिंग कंपनीसारखे नवीन पर्याय स्थापित करून रेल्वेसाठी आवश्यक गुंतवणुकीसाठी निधीचे स्रोत शोधण्याचा प्रयत्न या भांडवलाचे दुर्भिक्ष असलेल्या या क्षेत्राला मोठी चालना देणारे ठरेल. पैशाविना वर्षांनुवर्षे रखडलेले अनेक महत्त्वाचे प्रकल्प यातून मार्गी लागतील.
-अदि गोदरेज, माजी अध्यक्ष सीआयआय व अध्यक्ष गोदरेज समूह

नव्या दिशेने धडपड

एका बाजूला कार्यक्षमता कमालीची ढासळली आहे, तर दुसरीकडे रेल्वेचे जवळपास दिवाळेच वाजले आहे. अशा दयनीय परिस्थिती रेल्वेमंत्र्यांनी नव्या दिशेने केलेली धडपड, असे यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाचे वर्णन करता येईल. वेगळ्या मार्गाने रेल्वेसाठी निधी उभा करण्याचा रेल्वेमंत्र्यांचा प्रयत्न असून, त्यांच्या अंदाजपत्रकावर पंतप्रधानांच्या योजनांची छाप दिसून येते.
-डॉ. एम. आर. खांबेटे,   अध्यक्ष, कोसिआ

रेल्वेचा चेहरामोहराच बदलेल
विविध राज्ये आणि खासगी क्षेत्राला
रेल्वेच्या विकासात प्रथम सामावून घेतले गेले आहे. समर्पित मालवाहतूक प्रांगण (डीएफसी) निर्माण करणे, लोकोमोटिव्हमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब अशी पावले टाकून मालवाहतूक क्षमता दीड अब्ज टनांपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य निश्चितच महत्त्वाकांक्षी आहे. आशा करू या की, या सर्व तरतुदींची वेळेत अंमलबजावणी होईल. तसे झाले तर रेल्वेचा चेहरामोहराच बदलेल.
-बनमाली अगरवाला, अध्यक्ष व सीईओ, जीई दक्षिण आशिया

रेल्वेतही रचनात्मक सुधारणांची पायाभरणी
यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाचा दृष्टिकोन हा खर्चकेंद्रित असण्यापेक्षा नफाकेंद्रित राहावा, ही सर्वात जमेची बाजू आहे. यातूनच या अर्थसंकल्पाचा रेल्वेला एक व्यवहार्य वाहतूक पर्याय बनविण्याची दूरदृष्टीही दिसून येते. रेल्वेला अधिकाधिक कार्यक्षम बनविण्यासाठी क्षमता वापराचे गुणोत्तर ८८.५ टक्क्यांपर्यंत सुधारण्याचा मानस हेच दर्शवितो. खुल्या बाजारातून निधी उभारून आवश्याक पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यावरील भर हा रेल्वेत रचनात्मक आणि व्यवस्थात्मक सुधारणांची सुरुवात ठरावी. खासगी-सार्वजनिक भागीदारीतून आवश्यक संसाधने उभी केली जाणार आहेत. रेल्वेच्या योजनाधीन खर्चात ५२ टक्क्यांनी वाढ करून ते एक लाख कोटी रुपयांवर नेण्याचा प्रस्ताव हा एकूण अर्थव्यवस्थेच्या गतिमानतेसाठी पूरक ठरेल. म्हणूनच सुरक्षितता, कार्यक्षमता, आधुनिकीकरण, सोयीस्करता आणि स्वच्छता या रेल्वे अर्थसंकल्पाच्या मुख्य स्तंभांना आता गुंतवणूक, निरंतरता आणि पारदर्शकता या नव्या स्तंभांची जोड मिळाली आहे, जी रेल्वेला एक सुप्रशासित व्यवस्थेत परावर्तित करू शकेल.
-वाय. एम. देवस्थळी, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एल अँड टी फायनान्स होल्डिंग्ज

रेल्वेसाठी गुंतवणूक पूरक
भारतीय रेल्वेच्या गुंतवणुकीबाबत सुरू राहिलेल्या उपासमारीकडे रेल्वेमंत्र्यांनी समर्पक लक्ष देतानाच, प्रवाशांच्या सेवेबाबत अनुभूतीला सुधारण्यासाठी आधुनिकीकरणाची समग्र योजना आखली आहे. महत्त्वाचे दीर्घ मुदतीची गुंतवणूक उभी करण्यासाठी विमा, पेन्शन फंड आणि बहुस्तरीय संस्थांसारखे नवीन स्रोत वापरण्याचा त्यांचा मानस कौतुकपात्र आहे. आगामी पाच वर्षांत रेल्वेसाठी ८.५ लाख कोटींची गुंतवणूक आकर्षिण्याचे उद्दिष्ट महत्त्वाकांक्षी निश्चितच आहे, पण ते एकूण आर्थिक वृद्धीलाही लक्षणीय चालना देणारे ठरेल.
-अजय एस. श्रीराम, अध्यक्ष, भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय)