उद्यमशील, उद्य‘मी’ ’ मकरंद जोशी

मागील काही लेखात आपण नादारी व दिवाळखोरी आणि त्यातून उद्भवणाऱ्या  बदलांविषयी चर्चा केली. मात्र कुठलाही बदल ही कोणासाठी तरी संधी असते. आपण त्या संधीचा फायदा कसा घेऊ  शकतो या विषयावर थोडे चिंतन यानिमित्ताने करूया.

आपण या विषयाची विभागणी पुढीलप्रमाणे करू शकतो :

१) माझे उद्योग क्षेत्र उदयोन्मुख आहे की अस्ताकडे झुकले आहे?

निसर्गाने/मानवाने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीला अंत/अस्त आहेच. निर्माण केलेल्या/झालेल्या प्रत्येक गोष्टीला अंत आहेच आणि हा निसर्गाचा नियम आहे. कुठलाही समाज, देश, विचार, संस्था, नाती यांना कधीतरी अस्त असतो. भांडवली बाजारात हुशार  गुंतवणूकदार हे तेजी आणि मंदी दोन्ही परिस्थितीत पैसे/नफा कमावतात. त्याचप्रमाणे आपला उद्योग उदयोन्मुख असेल तर त्यामध्ये अधिक गुंतवणूक करावी, त्या गुंतवणुकीत हात आखडता घेऊ नये.

उद्योग अस्ताकडे झुकले असेल तर आपल्यापेक्षा सक्षम उद्योगात विलीन करून आपले भांडवल व उद्योजकीय वेळ मोकळा करून घ्यावा. किंबहुना उद्योग यशाच्या शिखरावर असेल तेव्हा त्या वेळेस पुढचे शिखर दिसत नसेल किंवा पुढचे शिखर सर करण्याची आपली क्षमता नसेल तरी हा विचार करू शकतो.

२) माझे ग्राहक सुरक्षित आणि विकासाभिमुख आहेत का?

सामान्यत: ग्राहक आपल्याशी कसा वागतो व आपल्याला मोबदला कसा देतो हे दोन प्रमुख मुद्दे उद्योजकाच्या मनात सतत येत असतात. परंतु त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे हे आहे की, आपला ग्राहक सुरक्षित आणि विकासाभिमुख आहे का? जर तो तसा असेल तर अशा ग्राहकाच्या आपल्याशी असलेल्या संबंधांमध्ये सर्वात जास्त गुंतवणूक करावी. जर तसा नसेल तर आपल्या उद्योगाचा त्या ग्राहकाशी असलेल्या संबंधांबद्दल सजग राहावे. तसेच सुरक्षित आणि उदयोन्मुख ग्राहकांचा सतत शोध घ्यावा. संकटाच्या काळातदेखील जेव्हा एक उद्योग आजारी होतो तेव्हा त्या उद्योगाला विकत घ्यायला इतर उद्योग/गुंतवणूकदार तयार असतात.

आपण सतर्कपणे योग्य बाजूला असणे हे उद्योजकाचे कर्तव्य आहे. काही वेळेस जुने संबंध असल्यामुळे उद्योजक आपल्या ग्राहकाला मदत करतात. ही नक्कीच चांगली बाब आहे; मात्र हे करताना आपला उद्योग संकटात जाणार नाही याची दक्षता घेणे खूप आवश्यक आहे.

३) माझ्या उद्योग क्षेत्रातील इतर स्पर्धक संकटात आहेत का?

माझ्या उद्योग क्षेत्रातील इतर स्पर्धक संकटात असतील तर आपल्याला पुढील काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे :

  • – माझ्या स्पर्धकाने असे काय केले ज्यामुळे त्याचा उद्य्ोग आज संकटात आहे या गोष्टी टाळल्या पाहिजे.
  • – माझ्या उद्योगाची वाढ करावी का आहे ती परिस्थिती ठेवावी?
  • जर वाढ करावी तर त्या आजारी स्पर्धकामध्ये काही गुंतवणूक करावी का?
  • – जर तो आजारी उद्योग सावरला नाही तर त्याचा माझ्या उद्योगावर काय परिणाम होईल.
  • – तो आजारी उद्योग इतर स्पर्धकाने घेतला तर माझ्या उद्योगाला ते चालणार आहे का?
  • – इतर आर्थिक बाबी इत्यादी.

४) माझ्या उद्योग क्षेत्रातील काही भाग संकटात आहे का?

एक नासका आंबा परडीतील सगळे आंबे नासवून टाकू शकतो. त्याप्रमाणेच आपल्या उद्योगातील प्रत्येक भाग मजबूत आणि सशक्त आहे की नाही याची प्रत्येक वेळेस काळजी घेणे अंत्यंत आवश्यक आहे.

काही भाग संकटात असेल तर तत्परतेने त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. तो भाग उपाययोजनेच्या पलीकडे गेला असेल तर त्याला मूळ उद्योगापासून वेगळे केले पाहिजे. आणि त्याचबरोबर त्या उद्योगाचे देणी फेडून तो विषय बंद करावा किंवा इतर उद्योजकांना त्यात रस असेल तर तो उद्योग त्वरित हस्तांतरित करावा.

५) माझा खर्च मी कसा कमी करु शकतो?

जेव्हा उद्योग तेजीत असतो तेव्हाच काही अनावश्यक खर्च सुरु होतात/काही चुकीचे निर्णय होतात. मंदीचा काळ आपल्याला सर्व अनावश्यक खर्च कमी करण्याची संधी देतो, त्याचा पुरेपुर फायदा तज्ज्ञांच्या सहाय्याने उचलावा.

आर्थिक नियोजन, ताळेबंदाचा सतत अभ्यास, योग्य सल्लागार, उत्तम संचालक असतील तर प्रत्येक संकटातून आपण सही सलामत बाहेर पडू. किंबहुना त्यावर स्वार होऊन त्याच्या फायदा नक्कीच घेऊ  शकतो.

(लेखक कंपनी सचिव आहेत.) l makarandjoshi@mmjc.in