मौल्यवान धातूंचे दर अधिक गतीने तेजीकडे पोहोचले आहेत. मुंबईत तोळ्यासाठीचे दर बुधवारी २५० रूपयांनी वाढून ३१ हजारांच्याही पुढे गेले. मुंबईच्या सराफा बाजारात बंदअखेर सोने ३१, ३४० रूपयांवर स्थिरावले. त्याचबरोबर शुद्ध सोन्याचा १० ग्रॅमचा भावही याच प्रमाणात वाढल्याने ३१, ४९० रूपये झाले आहे. सोन्याच्या दरातील ही तेजी पाहून येत्या दिवाळीपर्यंत सोने ३२ हजारांच्याही पुढे जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही बुधवारी लक्षणीय वाढ नोंदली गेली. किलोचा चांदीचा दर एकाच व्यवहारात ८७० रूपयांनी वाढून ४७,५०५ रूपयांवर पोहोचला आहे. सोने तसेच चांदीच्या दरांमध्ये गेल्या दोन व्यवहारात मोठयाप्रमाणात वाढ झाली आहे. मंगळवारी चांदी किलोसाठी १,३३५ रूपयांनी वाढून ४६, ६३५ रूपयांवर होती. तर सोने दराने सप्ताहारांभीच तोळ्यासाठी ३१ हजारांची दरांची वेस ओलांडली होती.
अमेरिकेच्या फेडरल बँकेने त्यांच्या व्याजदरात कोणतीही वाढ न केल्याने त्याचा परिणाम सोने बाजारावर पडण्याची शक्यता आहे. मागीलवर्षांपेक्षा यंदा सोन्याच्या मागणीत सुमारे ३० टक्क्यांची वाढ झाल्याचे सूत्रांनी सांगितले. डॉलरच्या किंमतीत होणाऱ्या वाढीचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने प्रति औन्स १, ३५२.६५ अशा वरच्या टप्प्यावर आहे.