फ्लिफकार्ट, स्नॅपडील यांसारख्या ई-व्यापार संकेतस्थळांची स्पर्धक असलेल्या ऑनलाइन शॉपिंगमधील इन्फीबीम इन्कॉर्पोरेशनने भांडवली बाजारात प्रवेशाचा श्रीगणेशा प्रस्तावित केला आहे. येत्या २१ मार्चपासून कंपनीची सार्वजनिक भागविक्री खुली होत असून, त्यायोगे ४५० कोटी रुपये उभारण्याचा तिचा मानस आहे.

भांडवली बाजार नियामक ‘सेबी’कडून माहिती-तंत्रज्ञानावर बेतलेल्या नव्या युगाच्या नवोद्यमी (स्टार्ट अप्स) कंपन्यांसाठी निधी उभारणीत सुलभतेचे आणि शेअर बाजारात स्वतंत्रपणे सूचिबद्धतेचे प्रोत्साहनपर प्रयत्न सुरू असताना, इन्फीबीमने थेट मुख्य बाजारात सूचिबद्धतेचे पाऊल टाकले आहे. २००७ साली सुरू झालेल्या या कंपनीकडून इन्फीबीम डॉट कॉम, बिल्ड अ बझार, इन्सेप्ट आणि पिक्सस्क्वेअर अशी ई-व्यापार दालने सुरू आहेत.

बीएसई तसेच एनएसई अशा दोन्ही बाजारांत सूचिबद्धतेसाठी २१ मार्च ते २३ मार्च या दरम्यान इन्फीबीमच्या १० रु. दर्शनी मूल्याच्या समभागांची प्रत्येकी ३६० रु. ते ४३२ रु. या किमत पट्टय़ादरम्यान विक्री योजण्यात आली आहे. व्यक्तिगत छोटय़ा गुंतवणूकदारांना किमान ३४ समभागांसाठी आणि त्यापुढे ३४ समभागांच्या पटीत या किंमत पट्टय़ादरम्यान बोली लावून    भागविक्रीत सहभागी होता येईल.

एसबीआय कॅपिटल मार्केट आणि एलारा कॅपिटल इंडिया या कंपन्या भागविक्रीचे व्यवस्थापन पाहत आहेत. भागविक्रीतून मिळणाऱ्या निधीचा विनियोग सध्याच्या सहा गोदाम सुविधा आणि १२ दळवळण केंद्रांच्या जाळ्यामध्ये विस्तार तसेच माहिती-तंत्रज्ञान प्रणाली व पायाभूत सुविधांच्या सशक्ततेसाठी केला जाणार आहे, अशी माहिती कंपनीचे संचालक विशाल मेहता यांनी दिली.

भारत वायर रोप्स भागविक्रीतून ७० कोटी उभारणा

धातूचे मजबूत दोर निर्मितीतील अग्रणी कंपनी भारत वायर रोप्स लि.ने येत्या १८ मार्चपासून २२ मार्चपर्यंत आपल्या समभागांची सार्वजनिक खुली भागविक्री प्रस्तावित केली आहे. कंपनीच्या प्रत्येक १० रुपये दर्शनी मूल्याच्या समभागासाठी ४० ते ४५ रुपये असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला असून, या भागविक्रीतून ७० कोटी रुपयांचे भांडवल उभारले जाणे अपेक्षित आहे.

भारत वायर रोपने महाराष्ट्रातील चाळीसगाव येथे एकाच ठिकाणाहून ६६,००० मेट्रिक टन वार्षिक क्षमतेचा सर्वात मोठा दोर निर्मितीच्या प्रकल्पाची योजना आखली आहे. प्रकल्पासाठी एकूण ५०७.१८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, विविध सात बँकांबरोबर ३३० कोटी रुपयांच्या मुदतीच्या कर्जासाठी कंपनीचे सामंजस्य झाले आहे.

तर भागविक्रीतून येणारा निधीही या कामी वापरात येईल. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एम. एल. मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुरूप हा प्रकल्प चालू वर्षांत डिसेंबरपासून उत्पादन घेणे सुरू करेल.

कंपनीचा सध्याचा उत्पादन प्रकल्प आटगाव (जळगाव) येथे कार्यरत आहे.

नवीन प्रकल्पाच्या कार्यान्वयनातून भारत वायर रोपची उत्पादनक्षमता वार्षिक ७८,००० टनांवर जाईल. कंपनीच्या उत्पादनांचा वापर प्रामुख्याने नौकानयन, उद्वाहन, खाणकाम, पारेषण अशा विविध २५ उद्योगक्षेत्रांकडून केला जातो. छोटय़ा व्यक्तिगत गुंतवणूकदारांना किमान ३०० समभागांसाठी आणि त्यापुढे ३०० च्या पटीत ४० ते ४५ रुपयांदरम्यान बोली लावून या भागविक्रीत सहभागासाठी अर्ज करता येईल.