आंतरराष्ट्रीय बाजारात गडगडलेल्या तेलाच्या किमती आणि मार्च महिन्यात घाऊक किमतीवर आधारीत महागाईदरात झालेली दिलासादायी घसरण सोमवारी बाजारात तेजीची झुळूक घेऊन आली. रिझव्‍‌र्ह बँकेकडून अपेक्षित व्याजदर कपातीसाठी निर्माण झालेल्या या अनुकलतेने बाजाराचा निर्देशांक- ‘सेन्सेक्स’ने शुक्रवारच्या त्रिशतकी घसरणीनंतर आज ११५ अंशांची उसळी घेणारी कामगिरी करून दाखविली.
आज सकाळी बाजार उघडताच इन्फोसिसच्या निकालाने साधलेल्या निराशेचीच छाया दिसून आली आणि दोन्ही प्रमुख निर्देशांक शुक्रवारच्या बंद भावाखालीच उघडले. सेन्सेक्सने तर १८,१४४.२२ अंशांचा तळ दाखविला, तर निफ्टी निर्देशांक हा ५५००ची वेस जेमतेम सांभाळताना दिसला. मात्र मध्यान्हीच्या सुमाराला घाऊक किमतीवर आधारीत मार्च २०१३ मधील महागाईदराचे आकडे आले आणि बाजाराचा नूर पालटला. महागाईदराने ५.९६ टक्के अशी म्हणजे तीन वर्षांत प्रथमच सहा टक्क्यांखाली दाखविलेली नरमाई ही मरगळलेल्या बाजारात उत्साह घेऊन आली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ११५.२४ अंशांच्या (०.६३ टक्के) कमाईसह १८,३५७.८० वर बंद झाला, तर निफ्टीनेही ३९.८५ अंशांची (०.७२ टक्के) कमाई करून ५,५६८.४० अशी उंची गाठली.
आज बाजारात झालेल्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराच्या तेल व वायू निर्देशांकाने सर्वाधिक २.३७ टक्क्यांची कमाई केली. त्या खालोखाल व्याजदराबाबत संवेदनशील संलग्नता असलेल्या बँकेक्स, ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या निर्देशांकांनीही चांगली कमाई केली.
महागाईचा दर निरंतर चढा असल्याने रिझव्‍‌र्ह बँक आजवर व्याजदराबाबत कठोर धोरण अनुसरत आली आहे. पण महागाईची तीव्रता ओसरल्याचे आकडे पुढे आल्याने येत्या ३ मे रोजी जाहीर होत असलेल्या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीचे पतधोरण जाहीर करताना, रिझव्‍‌र्ह बँक प्रमुख व्याजदरात कपात करेल, ही आशा बळावली आहे. याच आशेने बाजारात आज बँकांच्या समभागांची मोठय़ा प्रमाणात खरेदी झाली आणि त्यांचे भाव वधारताना दिसून आले.
आज वधारणाऱ्या पहिल्या दहा समभागात मुख्यत्वे व्याज दरकपातीच्या आशेवर वर गेलेल्या सहा बँका तर कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्याने त्याचे थेट लाभार्थी ठरणाऱ्या जेट एअरवेज, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल या कंपन्यांचा समावेश होता.
व्याजदरात कपातीच्या आशा बळावल्या
देशातील मार्चमधील महागाई दर ६ टक्क्यांच्या खाली विसावला आहे. या कालावधीत भाज्यांच्या किंमती स्वस्त झाल्याने हा दर रिझव्‍‌र्ह बँकेच्या अपेक्षेस उतरला आहे. मध्यवर्ती बँकेच्या ३ मेच्या पतधोरणात व्याजदर कपातीची आशा यामुळे अधिक भक्कम होत आहे. मार्चमधील घाऊक किंमत निर्देशांक ५.९६ टक्के नोंदला गेला आहे. हा दर डिसेंबर २००९ मधील ४.९५ टक्क्यांनंतरचा सर्वात कमी दर आहे. फेब्रुवारी २०१३ मध्ये महागाई दर ६.८४ तर मार्च २०१२ मध्ये तो ७.६९ टक्के होता. दुहेरी आकडय़ातील चिंताजनक असलेला अन्नधान्याचा महागाई दरही ८.७३ टक्क्यांवर आला आहे. एकूण घाऊक किंमत निर्देशांकात अन्नधान्याचा हिस्सा १४.३४ टक्के असतो. तर मार्चमध्ये भाज्यांच्या किंमतीही शून्यावर, ०.९५ टक्क्यांवर स्थिरावल्या आहेत. फेब्रुवारीमध्ये त्या तब्बल १२.११ टक्के वाढलेल्या होत्या.