मार्च २०१३ मधील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाईचा दर किंचितसा घसरला असला तरी अद्यापही तो दुहेरी आकडय़ात कायम आहे. गेल्या महिन्यात किरकोळ महागाई दर १०.३९ टक्के नोंदला गेला आहे. तो फेब्रुवारीमध्ये १०.९१ टक्के होता. सलग चौथ्या महिन्यात किरकोळ महागाई दर हा दुहेरी आकडय़ात राहिला आहे. मार्चमध्ये भाज्यांच्या किमती मात्र १२.१६ टक्क्यांवर आल्या आहेत. आधीच्या महिन्यात त्यांचे दर तब्बल २१.२९ टक्क्यांनी वधारले होते. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित मार्च महिन्याचा महागाई दर येत्या सोमवारी जाहीर होणार आहे. फेब्रुवारीमध्ये हा दर ६.८४ टक्के नोंदला गेला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या ५ ते ६ टक्के अंदाजापेक्षा तो कितीतरी अधिक आहे. मध्यवर्ती बँकेला पतधोरणातील व्याजदर निश्चितीसाठी हा दर निर्णायक ठरतो.

फेब्रुवारीतील औद्योगिक उत्पादन दरही सकारात्मक
देशातील औद्योगिक उत्पादनदरात अपेक्षित सुधारणा नसली तरी त्यातील विपरीत घसरण थांबल्याचे संकेत फेब्रुवारीसाठी जाहीर झालेल्या अपेक्षेपेक्षा चांगल्या ०.६ टक्क्यांच्या आकडय़ांनी दिले. वर्षभरापूर्वी, फेब्रुवारी २०१२ मध्ये औद्योगिक उत्पादन दर ४.३ टक्के होता, तर महिन्यापूर्वी जानेवारी २०१३ मध्ये हा दर २.४ टक्के राहिला आहे. एप्रिल ते फेब्रुवारी या गेल्या आर्थिक वर्षांच्या ११ महिन्यांच्या कालावधीतील हा दर सरासरी ०.९ टक्के राहिला आहे.

व्याजदर कपातीला वाव
घसरता औद्योगिक विकास आणि सावरणारी महागाई यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत व्याजदर कमी करण्याची अपेक्षा उंचावली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे आगामी पतधोरण ३ मे रोजी जाहीर होत आहे. या समयी गव्हर्नर किमान पाव टक्का व्याजदर कमी करू शकतात, असा पर्याय उद्योग क्षेत्राने देऊ केला आहे. ‘फिक्की’चे सरचिटणीस दिदार सिंग यांनी म्हटले आहे की, फेब्रुवारीमधील कमी औद्योगिक उत्पादन दराचे आकडे गंभीर आहेत. उद्योग क्षेत्रात अधिक गुंतवणूक येण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर कमी करण्याची गरज आहे.