एप्रिलमध्ये घाऊक महागाई दर ३.१८ टक्क्य़ांवर

इंधनदरवाढीचा फडका एप्रिल महिन्यातील घाऊक महागाईपर्यंत पोहोचला आहे. गेल्या महिन्यात इंधनाचे दर वाढल्याने या कालावधीतील घाऊक महागाई दर ३.१८ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. आधीच्या, मार्च २०१८ मध्ये हा दर २.४७ टक्के होता. तर वर्षभरापूर्वी, एप्रिल २०१७ मध्ये महागाई दर ३.८५ टक्के होता. महागाई दर यंदा चार महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे.

येत्या महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेचे आगामी पतधोरण जाहीर होणार आहे. मध्यवर्ती बँकेने यापूर्वीच्या पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवले होते. चालू वित्त वर्षांच्या पहिल्याच महिन्यात इंधनाबरोबरच फळे तसेच भाज्यांच्या किंमतीही वाढल्या आहेत.

डिसेंबर २०१७ पासून सातत्याने घसरणारा घाऊक महागाई दर पुन्हा एकदा वाढीकडे झुकला आहे. इंधन तसेच अन्नधान्याच्या किंमती वाढल्याने यंदा त्यात अधिक भर पडली आहे. २०१७ च्या अखेरिस महागाईचा दर ३.५८ टक्के होता. सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या एप्रिलमध्ये अन्नधान्याच्या महागाईचा दर ०.८७ टक्के राहिला. आधीच्या महिन्यात तो काहीसा कमी, ०.२९ टक्के होता. त्याचप्रमाणे भाज्यांच्या किंमती एक टक्क्य़ापर्यंत वाढल्या आहेत. तर फळांच्या किंमतीतील दरवाढ दुहेरी अंकात, १९.४७ टक्क्य़ांपर्यंत झेपावली आहे. इंधनाबाबत, इंधन तसेच ऊर्जा दर ७.८५ टक्क्य़ांपर्यंत वाढले आहेत.  जागतिक बाजारात इंधनाचे दर पुन्हा एकदा गगनाला भिडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर प्रति पिंप ७५ डॉलपर्यंत झेपावले आहेत. २०१४ च्या समकक्ष सध्या हे दर आहेत. चालू वित्त वर्षांत एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान महागाईचा दर ४.७ ते ५.१ टक्के राहण्याचा अंदाज आहे.

किरकोळ महागाईतही वाढ

एप्रिल २०१८ मधील किरकोळ महागाई दरही उंचावत ४.५८ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. मार्चमध्ये तो ४.२८ टक्के तर एप्रिल २०१७ मध्ये तो २.९९ टक्के होता. जानेवारीपासून सातत्याने घसरणारा किरकोळ महागाई दर यंदा अन्नधान्याच्या किंमती वाढल्याने उंचावला.

चालू वित्त वर्षांच्या पहिल्या तिमाहीत महागाईचा कल वाढता राहण्याची शक्यता आहे. महिन्याला वस्तू व सेवा कर संकलनाचे प्रमाण कसे राहते यावरच सरकार इंधनावरील उत्पादन शुल्काबाबत विचार करू शकेल. तोपर्यंत इंधन दरवाढीबाबत काही सांगता येणार नाही.

अदिती नायर, प्रधान अर्थतज्ज्ञ, इक्रा.

२०१८ च्या शेवटच्या तिमाहीपासून रिझव्‍‌र्ह बँक कदाचित व्याजदर वाढविण्यास सुरुवात करेल. मार्च २०१९ पर्यंत मध्यवर्ती बँकेचा रेपो दर ६.७५ टक्के होईल. काही कालावधीसाठी मागणी स्थिर राहणार असून खासगी गुंतवणूकीतही फार हालचाल होण्याची शक्यता नाही.

मॉर्गन स्टेनलेच्या अहवालातील भाष्य.