19 March 2019

News Flash

महागाई दर ५ टक्क्यांनजीक

५.८० टक्क्यांपर्यंत भडकलेल्या इंधन महागाईचीही भर

(प्रतिकात्मक छायाचित्र )

अन्नधान्याच्या किंमतवाढीने किरकोळ महागाई दराचा चार महिन्यांचा उच्चांक; ५.८० टक्क्यांपर्यंत भडकलेल्या इंधन महागाईचीही भर

अन्नधान्याच्या किमतीत वाढ झाल्याने किरकोळ किंमतींवर आधारीत महागाई दर ५ टक्क्यांनजीक पोहोचला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या अंदाजापेक्षा किती तरी अधिक असा हा दर गेल्या चार महिन्यांतील सर्वाधिक पातळीवर आहे.

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित मे महिन्यातील महागाई दर  ४.८७ टक्के नोंदविला गेला. आधीच्या एप्रिलमध्ये तो ४.५८ टक्के होता, तर वर्षभरापूर्वी, मे २०१७ मध्ये तो २.१८ टक्के होता. यापूर्वी महागाई दर जानेवारी २०१८ मध्ये सर्वाधिक ५.७ टक्के टप्प्यावर होता.

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अन्नधान्यांच्या महागाईचा दर एप्रिलमधील २.८ टक्क्यांवरून यंदाच्या मेमध्ये ३.१० टक्क्यांवर झेपावला आहे. गेल्या महिन्यात फळांच्या किमती १२.३३ टक्क्यांवर गेल्या आहेत. त्या यापूर्वी एक अंकी आकडय़ातील होत्या. मसाल्याच्या किमतीही यंदा २.७८ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. तर तेल आदी जिनसांचे दर २.४६ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. इंधन तसेच ऊर्जा क्षेत्रातील महागाई आधीच्या ५.२४ टक्क्यांवरून ५.८० टक्क्यांपर्यंत गेले आहेत. अंडी, मटण, मासे आदींच्या किमती तुलनेत यंदाच्या मेमध्ये कमी झाल्या आहेत.

महागाई वाढण्याची भीती व्यक्त करत रिझव्‍‌र्ह बँकेने नुकतेच पतधोरणात रेपो दर थेट पाव टक्क्याने वाढवत ते ६.२५ टक्क्यांवर नेले आहेत. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीत महागाई दर ४.८ ते ४.९ टक्के असेल व उर्वरित सहामाहीत तो ४.७ टक्के असेल, असा अंदाज रिझव्‍‌र्ह बँकेने पतधोरणात जाहीर केला आहे.

First Published on June 13, 2018 1:19 am

Web Title: inflation in india 3