देशात डाळींच्या किमती आटोक्यात ठेवण्यासाठी सरकार पाच हजार टन तूर व उडीद डाळ आयात करणार आहे, असे मंगळवारी अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आले.
डाळींच्या किरकोळ किमती खूपच वाढल्या असून देशाच्या अनेक भागात तूर डाळीचे दर किलोमागे १०० रूपयांवर गेले आहेत. सरलेल्या २०१४-१५ मध्ये प्रतिकूल हवामानामुळे तुरीचे पीक पुरेसे झाले नसून, तूर डाळीचे उत्पादन २० लाख टनांनी घटले आहे.
केंद्रीय ग्राहक कामकाज मंत्रालयातील सचिव सी.विश्वनाथ यांनी राज्यांच्या अन्न मंत्र्यांच्या बैठकीत सांगितले की, जूननंतर आवश्यक पदार्थाच्या किमती वाढल्या आहेत, त्यात डाळींचे दर खूपच वाढले आहेत.
त्यामुळे पुरवठा वाढवण्याकरिता उडदाची ५ हजार टन डाळ आयात केली जाईल. ५ हजार टन तूर डाळही आयात केली जाणार असून सप्टेंबरमध्ये ती येईल, त्याच्या निविदा आधीच काढल्या आहेत.
काबुली चना व सेंद्रिय डाळी वगळता १० हजार टनांच्यापेक्षा अधिक डाळ निर्यात करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. राज्य सरकारांना व्यापाऱ्यांना साठय़ाची मर्यादा ठरवून देता येईल. सप्टेंबपर्यंत साठय़ाची मर्यादा लागू राहणार आहे असे सचिवांनी सांगितले.
यंदाच्या वर्षी डाळींच्या आधारभूत किमती वाढवल्याने त्यांच्या लागवडीस उत्तेजन मिळणार आहे. सरकार दरवर्षी ४० लाख टन डाळ आयात करते. डाळींचे उत्पादन २०१४-१५ मध्ये १७.३८ दशलक्ष टन झाले होते, आधीच्या वर्षी ते १९.२५ दशलक्ष टन झाले होते. गेल्या वर्षी डाळींचे उत्पादन कमी पाऊस व बेमोसमी पावसामुळे घटले होते.