• स्वस्त अन्नधान्यामुळे फेब्रुवारीत दर ४.४ टक्के
  • निर्मिती क्षेत्राची जानेवारीतील वाढ ८.७ टक्क्य़ांवर

अन्नधान्य तसेच इंधनाचे दर कमी झाल्याने फेब्रुवारीतील किरकोळ निर्देशांकावर आधारित महागाई दर ४.४ टक्के असा नरमला आहे. आधीच्या, जानेवारी २०१८ मध्ये हा दर ५.०७ टक्के होता. तर वर्षभरापूर्वी, फेब्रुवारी २०१७ रोजी तो ३.६५ टक्के नोंदला गेला होता. यापूर्वी किरकोळ महागाई दर नोव्हेंबर २०१७ मध्ये ४.८८ टक्के असा किमान होता.

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अन्नधान्याचा महागाई दर गेल्या महिन्यात ३.२६ टक्के नोंदला गेला आहे. तर भाज्यांचे दर फेब्रुवारीत १७.५७ टक्के राहिले आहेत. जानेवारीत ते तब्बल २६.९७ टक्के होते. तर फळांच्या किंमती ४.८० टक्क्य़ांपर्यंत खाली आल्या आहेत. दूध तसेच दुग्धजन्य पदार्थाचे दर ४.२१ टक्क्य़ांपर्यंत घसरल्या आहेत. डाळी, मटण, मासे, अंडी यांच्याही किंमती यंदा कमी झाल्या आहेत.

इंधन व ऊर्जा दर ६.८० टक्के राहिले आहेत.

जानेवारी २०१७ मधील ३.५ टक्क्य़ांच्या तुलनेत औद्योगिक उत्पादन दर दुपटीहून अधिक नोंदला गेला आहे. निर्मिती वस्तू तसेच ग्राहकपयोगी वस्तू, भांडवली वस्तूंना असलेल्या मागणीमुळे हे घडले आहे.

औद्योगिक उत्पादन निर्देशांकात ७७.६३ टक्के हिस्सा राखणाऱ्या निर्मिती क्षेत्राची वाढ लक्षणीय मानली जात आहे. निर्मिती क्षेत्र ८.७ टक्क्य़ांनी विस्तारले आहे. जानेवारी २०१७ मध्ये ते २.५ टक्के होते. भांडवली वस्तू क्षेत्राची वाढ १४.६ टक्के झाली आहे. ग्राहकपयोगी बिगर वस्तू क्षेत्राची वाढ १०.५ टक्के तर ग्राहकपयोगी वस्तू क्षेत्राची वाढ ९.६ टक्के नोंदली गेली आहे. खनिकर्म क्षेत्र ०.१ टक्क्य़ाने वाढले आहे. निर्मिती क्षेत्रातील २३ पैकी १६ उद्योगाची वाढ सकारात्मक राहिली आहे. चालू वित्त वर्षांच्या एप्रिल ते जानेवारी दरम्यानची औद्योगिक उत्पादन दर वाढ ४.१ टक्के राहिली. ती वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील ५ टक्क्य़ांच्या तुलनेत किरकोळ घसरली आहे.