घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित वर्षांच्या सुरुवातीचा महागाईचा दर उणे स्थितीत आला आहे. जानेवारी २०१५ मध्ये ०.३९ टक्के दर राखताना महागाई दर गेल्या तिमाहीत दुसऱ्यांदा उणे स्थितीत नोंदला गेला आहे.
पेट्रोलियम पदार्थासह अन्न धान्याच्या किंमती स्थिरावल्याने यंदाचा महागाई दर ही गेल्या साडे पाच वर्षांच्या तळात विसावला आहे. यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत पुन्हा एकदा व्याजदर कपातीच्या निर्णयाची अपेक्षा अधिक दृढ होत आहे.
Untitled-1
घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर डिसेंबर २०१४ मध्येही उणे स्थितीत, ०.११ टक्के होता. तर सुधारित नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार तो ०.१७ टक्के राहिला आहे. या महिन्यात आधी जाहीर झालेला दरही शून्य टक्के होता.
जानेवारीमध्ये कमी झालेल्या महागाई दरामध्ये अन्नधान्य तसेच पेट्रोलियम पदार्थाच्या कमी झालेल्या दरांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. गेल्या सहा महिन्यात अन्नधान्याच्या महागाई दराचा आकडा ८ टक्क्य़ांवर गेला होता.
महागाईचा दर यापूर्वी जून २००९ मध्ये शून्यावर (-०.४ टक्के) होता. तर यंदा इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील दर उणे १०.६९ टक्के राहिला आहे. तर उत्पादित वस्तूंच्या किंमतीही १.०५ टक्क्य़ांवरच आहेत. पेट्रोलच्या किंमती १७.०८ टक्क्य़ांपर्यंत घसरल्या आहेत. तर डिझेलचे दरही जानेवारीत कमी झाले आहेत. डाळी, भाज्या, मसाल्यांचे पदार्थ यांचे दर आधीच्या महिन्याच्या तुलनेत मात्र उंचावले आहेत. तर वर्षांच्या सुरुवातीला बटाटे, दूध, तांदूळ, अंडी, मटण, मांस यांच्या किंमती कमी राहिल्या आहेत. डिसेंबरमधील २.१७ टक्क्य़ांच्या तुलनेत प्राथमिक वस्तूंच्या किंमती जानेवारी ३.२७ टक्के अशा वाढल्या आहेत.
जानेवारीतील किरकोळ महागाई दर मासिक तुलनेत ५.११ टक्के वाढला होता. महागाईसाठी मोजले जाणाऱ्या नव्या पद्धतीनुसारदेखील तो यंदा अन्नधान्याच्या किंमती वाढल्याने उंचावला होता.