देशातील घाऊक किमतीवर आधारित महागाई दराचा उणे स्थितीतील प्रवास सप्टेंबरमध्येही कायम राहिला. पण हा दर आधीच्या महिन्यातील (-) ४.९५ टक्क्यांवरून (-) ४.५४ टक्के असा किंचित वधारल्याचे बुधवारी अधिकृतपणे प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये घाऊक किमतीवरील महागाईचा दर २.३८ टक्के असा होता. दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या किरकोळ किंमत निर्देशांकही ऑगस्टमधील ३.७४ टक्के दराच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये ४.४१ टक्के असा वधारला आहे.
भारतीय कुटुंबाच्या खाद्यान्नात महत्त्वाचा घटक असलेल्या डाळी, कांदा, दूध, अंडी, मांस आणि मासे यांच्या वधारलेल्या किमतीमुळे महागाई दर आधीच्या महिन्याच्या तुलनेत वधारला आहे. तथापि, नोव्हेंबर २०१४ पासून सलग ११व्या महिन्यांत त्यातील उणे वाढीचा क्रम मात्र कायम राहिला आहे.
घाऊक किंमत निर्देशांकातील तीन घटकांमध्ये सरलेल्या सप्टेंबरमध्ये वाढ झाली आहे. प्राथमिक जिनसा (कृषी उत्पादने) आणि उत्पादित वस्तू यांच्या किमती आधीच्या महिन्याच्या तुलनेत अनुक्रमे ०.४ टक्के व ०.१ टक्क्यांनी वधारल्या आहेत. अन्नधान्याच्या किमतीही ०.६९ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्या उलट इंधन व ऊर्जा घटकात १.७ टक्के घट झाली आहे.
अन्नधान्य घटकांत समाविष्ट असलेला कांदा ११३.७० टक्क्यांनी महिनागणिक भडकला आहे, तर डाळींे ३८.५६ टक्क्यांनी कडाडल्या. त्याच वेळी बटाटे व भाज्यांच्या किमती महिनागणिक अनुक्रमे ५७.३४ टक्के व ९.४५ टक्के खालावल्या आहेत. कडधान्ये व भाताच्या किमतीही अनुक्रमे १.०२ टक्के व ३.६४ टक्के अशा घटल्या आहेत. परिणामी, अन्नधान्य निर्देशांक महिनागणिक उंचावला आहे. खाद्यतेल दरही वार्षिक तुलनेत ३.२१ टक्के भडकल आहेत.