भाज्या, डाळींसह अन्नधान्यांच्या किमती वाढल्याने जूनमधील किरकोळ किमतीवर आधारीत महागाई दर ५.७७ टक्क्यांवर गेला आहे. आधीच्या महिन्याच्या तुलनेत तो किरकोळ वाढला असला तरी जवळपास ६ टक्क्यांनजीकची महागाई आता गेल्या २२ महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचली आहे.
मेमध्ये किरकोळ महागाई दर ५.७६ टक्के, तर वर्षभरापूर्वी जून २०१५ मध्ये दर ५.४० टक्के होता. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित हा दर रिझव्‍‌र्ह बँकेच्या ५ टक्के या सहनशील पातळीपेक्षा अधिक आहे. प्रामुख्याने अन्नधान्यांच्या किमतीचा दर जूनमध्ये ७.७९ टक्के नोंदला गेल्यामुळे एकूण किरकोळ महागाई वाढली आहे. जूनमध्ये भाज्यांच्या किमती १४.७४ टक्के वाढल्या आहेत, तर डाळींचे दर ३.०७ टक्क्यांवर गेले आहेत. डाळींच्या किमती मात्र घसरून २६.८६ टक्क्यांवर आले आहेत. अंडी, मासे, मटण, दूध यांच्या दरांमध्ये किरकोळ घसरण झाली आहे. इंधन व ऊर्जा दरदेखील नाममात्र प्रमाणात घसरले आहेत.