22 September 2020

News Flash

महागाई दराबाबतचे उद्दिष्ट आणखी खालावू शकेल!

महागाई दराबाबत निश्चित केले गेलेले उद्दिष्ट गाठताना, जर तिचा स्तर समाधानकारक पातळीवर दिसल्यास तो भविष्यात आणखी खाली आणला जाईल, असे रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम यांनी

| March 7, 2015 06:33 am

महागाई दराबाबत निश्चित केले गेलेले उद्दिष्ट गाठताना, जर तिचा स्तर समाधानकारक पातळीवर दिसल्यास तो भविष्यात आणखी खाली आणला जाईल, असे रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम यांनी प्रतिपादन करतानाच, आणखी कठीण लक्ष्य गाठले जाण्याबाबत विश्वासही व्यक्त केला.

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी किरकोळ महागाई दराचे ६ टक्के दराचे लक्ष्य जानेवारी २०१६ पर्यंत राखले आहे. तर त्या पुढील वर्षभरात ते ४ टक्के इतके आहे. महागाईवरील नियंत्रणात समन्वय साधण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँक व केंद्रीय अर्थखाते यांच्यात गेल्याच आठवडय़ात एक करार करण्यात आला. आणि लगोलग पाव टक्क्यांची दोन महिन्यांच्या अंतरात दुसरी रेपो दरात कपातही रिझव्‍‌र्ह बँकेने केली. मध्यवर्ती बँकेचे आगामी पतधोरण येत्या ७ एप्रिल रोजी आहे.
याच कराराचा उल्लेख करत राजन यांनी शुक्रवारी वर्षभरानंतरच्या (४ टक्के) निश्चित महागाई दराच्या दोन टक्के अल्याड अथवा पल्याड राहण्याची शक्यताही वर्तविली. किरकोळ महागाईचा दर येत्या ५ ते १० वर्षांत अधिक आखडता राहील, असेही राजन विश्लेषकांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले. बँकेने निश्चित केलेला महागाईचा अंदाज हा खूपच सहनशील असल्याचेही ते या वेळी म्हणाले.
केंद्र सरकारबरोबर करण्यात आलेल्या कराराचा उल्लेख करत महागाई दर निश्चिीतीबाबतची प्रक्रिया नुकतीच सुरू झाली असून काही काळ प्रतीक्षा करणे आवश्यक ठरेल, असे नमूद केले. दीर्घ कालावधी लक्षात घेतला तर निश्चित दर अंदाज आणखी कमी केला जाईल, असेही ते म्हणाले. ४ टक्के महागाई दराबाबतचे लक्ष्य कसे निश्चित करत आहोत, हेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. यासाठी त्यांनी देशातील उद्योग क्षेत्राच्या आगामी हालचालींचा अंदाज बांधला आहे.
महागाईवर लक्ष केंद्रित करून पतधोरण आखण्यासाठी नुकत्याच करण्यात आलेल्या करारांतर्गत पतधोरण समितीही स्थापन करण्यात आली आहे. ही समिती बँकेला महागाईचे अधिक स्पष्ट उद्दिष्ट सुचवेल. जानेवारीमध्ये ५.११ टक्के नोंदला गेलेला महागाई दर फेब्रुवारीत ५.५ टक्क्यांच्या आसपास असण्याचा विश्लेषकांचा होरा आहे.

२०१७ पर्यंत आणखी दर कपात नाही : नोमुरा
रिझव्‍‌र्ह बँकेच्या चालू वर्षांत दोन महिन्यांच्या अंतराने सलग दोन प्रत्येकी पाव टक्क्य़ांच्या रेपो दर कपात केल्याने उद्योगक्षेत्राची एकूण वर्षांसाठी आणखी किमान एक टक्का व्याजदर कपातीची आशा बळावली आहे. तथापि नोमुरा या दलाल पेढीला मात्र २०१७ पर्यंत आणखी व्याजदर कपात होणार नाही असे वाटते. रिझव्‍‌र्ह बँकेच्या गेल्या आठवडय़ातील पाव टक्का कपातीने रेपो दर आता ७.५० टक्क्यांवर आले आहेत. या जपानी संस्थेच्या अंदाजाने हे दर निम्नतम पातळीवर असून, येत्या तीन वर्षांत ते ७.४० टक्क्यांच्या खाली येणार नाहीत. संथावलेली जागतिक अर्थव्यवस्था, कच्च्या तेलाच्या दरातील ताजा उठाव व स्थानिक पातळीवर अद्याप न स्थिरावलेली महागाई या जोरावर आणखी पाव टक्का दरकपातही जोखमीची ठरेल, असेही नोमुराने आपल्या अहवालात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2015 6:33 am

Web Title: inflation rate targets may fall down says raghuram rajan
Next Stories
1 ‘पहल’ योजनेत ८१ टक्के गॅस सिलिंडरधारक
2 आर्थिक स्वावलंबनाबरोबरच स्त्रियांकडे वित्तीय नियोजनही हवे!
3 बँक महासंघ आणि विमा कंपन्यांची संयुक्त बैठक
Just Now!
X