चार महिन्यांतील उच्चांकी झेप

वाढत्या अन्नधान्याच्या किमती तसेच इंधनाचे दर यामुळे सरलेल्या मार्च महिन्यात किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ५.५२ टक्के नोंदला गेला आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाद्वारे जाहीर होणारा हा दर महिन्यापूर्वी, फेब्रुवारी २०२१ मध्ये ५.०३ टक्के होता.

एकूण किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकातील प्रमुख अन्नधान्याच्या किमतीचा निर्देशांक यंदाच्या मार्चमध्ये ४.९४ टक्के नोंदला गेला आहे. आधीच्या महिन्यात तो तुलनेने कमी, ३.८७ टक्के होता, तर इंधन व ऊर्जा गटातील वस्तूंच्या किमती एक टक्क्याने झेपावल्या आहेत. फेब्रुवारीमधील ३.५३ टक्क्यांच्या तुलनेत त्या गेल्या महिन्यात ४.५० टक्के झाल्या आहेत.

वाढत्या महागाईबाबत चिंता व्यक्त करत रिझव्र्ह बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच द्वैमासिक पतधोरणात प्रमुख व्याज दर स्थिर ठेवण्याचे धोरण गेल्याच आठवड्यात जाहीर केले होते.

वित्त वर्ष २०२०-२१ मधील जून ते नोव्हेंबर असे सलग सहा महिने महागाई दर सहनशील अशा ६ टक्क्यांवर राहिल्यानंतर डिसेंबर व जानेवारीमध्ये तो खाली आला होता. मात्र पुढच्याच महिन्यात तो ५ टक्क्यांवर पोहोचला.