इंधन, अन्नधान्य किंमतवाढीचा परिणाम

किरकोळपाठोपाठ घाऊक महागाई दरानेही गेल्या काही महिन्यांचा उच्चांकी स्तर गाठला आहे. इंधन तसेच अन्नधान्याच्या किमती वाढल्याने ऑक्टोबरमधील घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ३.५९ टक्क्यांवर गेला आहे.

घाऊक महागाईचा हा गेल्या सहा महिन्यांतील सर्वोच्च टप्पा आहे. आधीच्या सप्टेंबरमध्ये हा दर २.६० टक्के होता, तर वर्षभरापूर्वी, ऑक्टोबर २०१६ मध्ये तो १.२७ टक्के नोंदला गेला होता. चालू आर्थिक वर्षांच्या सुरुवातीला महागाई दर ४ टक्क्यांच्या नजीक होता. एप्रिल २०१७ च्या समकक्ष आता तो पोहोचला आहे.

ऑक्टोबरमधील किरकोळ महागाई दर गेल्या सात महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचल्याची आकडेवारी सोमवारीच जाहीर होती. किरकोळ तसेच घाऊक महागाई दर वाढल्याने आता रिझव्‍‌र्ह बँक तिच्या पतधोरणात व्याजदर कपात करण्याची अपेक्षा कमी आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे आगामी पतधोरण येत्या महिन्यात जाहीर होणार आहे. सप्टेंबरमधील औद्योगिक उत्पादन दरही ३.८ टक्के असा संथ नोंदला गेला.

ऑक्टोबरमध्ये अन्नधान्याच्या किमती दुपटीने वाढून ४.३० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. यामध्ये कांद्याचे दर तब्बल १२७.०४ टक्क्यांनी वाढले आहेत, तर भाज्यांच्या किमती ३६.६१ टक्क्यांनी वाढल्या आहेत. अंडी, मटण, मासे यांच्या किमतीत ५.७६ टक्क्यांची भर पडली आहे. डाळी, बटाटे, गहू यांच्या किमतींमध्ये गेल्या महिन्यात उतार दिसून आला आहे.

इंधन, ऊर्जा दर दुहेरी अंकापर्यंत उंचावले आहेत. वर्षभरापूर्वी ते १० टक्क्यांच्या खाली होते. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल दर वाढण्यासह येथील पेट्रोल तसेच डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. तसेच देशांतर्गत कमी उत्पादनामुळे ऊर्जा दरही वाढले आहेत. याचा परिणाम येत्या कालावधीत आयात देयके तसेच परकी चलनावर होण्याची भीती ‘अ‍ॅसोचेम’ या उद्योग संघटनेने व्यक्त केली आहे.

अन्नधान्य घटकातील भाज्या, फळे त्याचबरोबर खनिज तेल, नैसर्गिक वायू, इंधन, ऊर्जा आदींच्या किमती गेल्या महिन्यात वाढल्याने एकूण घाऊक किंमत निर्देशांकावर यंदा भार पडला आहे, अशी प्रतिक्रिया इक्राच्या प्रधान अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी दिली आहे.

बदललेल्या ‘जीएसटी दरां’मुळे महागाई कमी होणार – नोमुरा

वस्तू व सेवा करप्रणालीअंतर्गत गेल्या आठवडय़ात तब्बल २१३ वस्तू कमी कराच्या टप्प्यात आणल्या गेल्यामुळे येत्या कालावधीत महागाई काही प्रमाणात कमी होईल, असा विश्वास नोमुरा या जागतिक वित्तीय सेवा कंपनीने व्यक्त केला आहे. २८ टक्के कर टप्प्यातील १७८ वस्तू १८ टक्के कर स्तरामध्ये आणले गेल्याने महागाई दर ०.२० टक्क्याने कमी होईल, असे नमूद करण्यात आले आहे. बदललेल्या करांची अंमलबजावणी बुधवार, १५ नोव्हेंबरपासून होत आहे.