इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांची कंपनीच्या नॉन एक्झिक्युटीव्ह चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशाल सिक्का यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिल्यानंतर कंपनीचे नेतृत्व कोणाकडे येणार, याची उत्सुकता होती. सिक्का यांच्या राजीनाम्याचा कंपनीच्या समभागांच्या किमतींवरदेखील परिणाम झाला होता. त्यामुळे आता निलेकणी यांच्याकडे कंपनीच्या नॉन एक्झिक्युटीव्ह चेअरमन पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळावरील विद्यमान अध्यक्ष आर. शेषसायी आणि सहअध्यक्ष रवी व्यंकटेशन यांनी राजीनामे दिल्यानंतर सहसंस्थापक असलेले निलेकणी कंपनीत परतले आहेत.

विशाल सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर इन्फोसिसमध्ये राजीनामासत्र सुरु झाले. संचालक मंडळाचे सदस्य जेफ्री एस. लेहमन आणि जॉन एचमेंडींनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिला आहे. या दोघांचेही राजीनामे स्वीकारण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर निलेकणी इन्फोसिसमध्ये परतले आहेत. सिक्का यांनी मागील आठवड्यात राजीनामा दिल्यानंतर निलेकणी यांना कंपनीत परत आणण्याच्या हालचाली वेगाने सुरु झाल्या होत्या. भांडवली बाजारात सूचिबद्ध या कंपनीत वर्चस्व असलेल्या गुंतवणूकदार संस्था सल्लागारांनी निलेकणी यांच्या नावाची शिफारस कंपनीच्या संचालक मंडळाला केली होती. अखेर अपेक्षेप्रमाणे निलेकणी कंपनीत परतले आहेत.

यूआयडीएआयमध्ये काम करण्यासाठी नंदन निलेकणी २००९ मध्ये इन्फोसिसमधून बाहेर पडले. त्यानंतर ते कायमच इन्फोसिसपासून अंतर राखून होते. २०१३ मध्ये इन्फोसिसचे सहसंस्थापक असलेले नारायण मूर्ती कंपनीत परतले. त्यावेळी त्यांनी निलेकणी यांनादेखील कंपनीत परतण्यास सांगितले होते. मात्र निलेकणी यांनी मूर्ती यांचे ऐकले नव्हते, असे म्हटले जाते. मात्र मूर्ती यांच्याकडून कामात ढवळाढवळ होत असल्याने विशाल सिक्का यांनी मुख्य कार्यकारी पदाचा राजीनामा दिल्यानंतर निलेकणी कंपनीच्या नॉन एक्झिक्युटीव्ह चेअरमनपदी आले आहेत.