कर्मचाऱ्याचे कंपनी संचालक मंडळाला आरोप‘पत्र’

वृत्तसंस्था, बंगळुरू

गेल्याच आठवडय़ात तिमाही वित्तीय निष्कर्ष जाहीर करणाऱ्या कंपनीच्या ताळेबंदात नफ्याची आकडेवारी फुगविण्यात आली असल्याचा आरोप इन्फोसिसच्या कर्मचाऱ्याने केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाला उद्देशून लिहिलेल्या चार पानी पत्रात संबंधित कर्मचाऱ्याने आपले नाव जाहीर न करता आर्थिक ताळेबंदाच्या गैर व्यवहाराचा आरोप केला आहे.

कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने गेल्या तिमाहीचा सादर केलेला ताळेबंद चुकीचा असून त्यातील नफ्याची आकडेवारी ही खोटी असल्याचा दावा या कर्मचाऱ्याने याबाबतच्या पत्रात केला आहे. पत्राखाली नाव न लिहिता कंपनीच्या संचालक मंडळाला हे पत्र रविवारी लिहिण्यात आले आहे.

या पत्रामुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी सलिल पारेख संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून, याबाबतचे म्हणणे लेखा परिक्षण समितीपुढे मांडले असल्याचे स्पष्ट केले आहे. तर पत्रात करण्यात आलेल्या आरोपाबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

व्हेरिझोन, इंटेल, एबीएन एम्रोसारख्याच्या अधिग्रहणाद्वारे झालेले महसुली उत्पादन ताळेबंदात नमूद केले त्याप्रमाणे प्रत्यक्षात नसल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. ताळेबंदात नमूद व्हिसामूल्याबाबतची शंकाही पत्रात उपस्थित करण्यात आलीोहे.

पारेख यांनी माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांचे कंपनीचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी सुशासनाबाबत आक्षेप घेतल्यानंतर कंपनीच्या मुख्याधिकारीपदाची सूत्रे दोन वर्षांपूर्वी घेतली.