टीसीएसचा नेतृत्वबदलही नाराजीचा; सलग तीन दिवसांच्या बाजारतेजीला खीळ

देशातील दुसरी मोठी सॉफ्टवेअर सेवा निर्यातदार कंपनी इन्फोसिस टेक्नॉलॉजीजने सरलेल्या ऑक्टोबर-डिसेंबर २०१६ तिमाहीसाठी टीसीएसप्रमाणे नफ्याच्या बाबतीत अपेक्षेपेक्षा सरस कामगिरी नोंदविली. २०१६ सालात कंपनीने १० अब्ज डॉलरचा महत्त्वाचा महसुली टप्पाही ओलांडला; परंतु संपूर्ण आर्थिक वर्षांसाठी अपेक्षित महसूलाबाबत घसरलेले निर्देश गुंतवणूकदारांची निराशा करणारे ठरले. परिणामी चांगल्या तिमाही निकालापश्चातही इन्फोसिसच्या समभागांत अडीच टक्क्यांची, तर एन. चंद्रशेखर यांच्या हाती टाटा समूहाची धुरा आल्याने, टीसीएसवरील नेतृत्वबदलाबद्दल नाराजी या समभागाच्या जवळपास चार टक्क्य़ांच्या आपटीतून दिसून आली.

इन्फोसिसने शुक्रवारी सकाळी डिसेंबर २०१६ अखेर तिसऱ्या तिमाहीत ३,७०८ कोटी रुपयांच्या निव्वळ नफा कमावणारी कामगिरी जाहीर केली. गतवर्षांतील याच तिमाहीतील नफ्याच्या तुलनेत त्यात यंदा ७ टक्क्य़ांनी वाढ झाली, तर तिमाहीसाठी कंपनीच्या महसुलातही वार्षिक तुलनेत ८.६ टक्के वाढ होऊन, तो १७,२७३ कोटी रुपयांवर गेला आहे. यंदाच्या तिमाहीत कंपनीची कामगिरी फारशी चांगली नसेल, किंबहुना नकारात्मक असेल असा बाजार विश्लेषकांमध्ये सार्वत्रिक मतप्रवाह असताना, प्रत्यक्षात तुलनेने समाधानकारक आलेले आकडे भागधारकांना सुखावणारे ठरले. परिणामी सकाळी बाजार उघडताच इन्फोसिसच्या समभाग ४ टक्क्य़ांनी उसळल्याचे दिसले.

मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांच्या नेतृत्वात इन्फोसिसच्या कामगिरीचा आलेख तिमाहीगणिक उंचावत चालला आहे. त्यातच सिक्का यांच्या दृष्टीने भावपूर्ण बाब म्हणजे कंपनीने वार्षिक महसुलात १० अब्ज अमेरिकी डॉलरचा मैलाचा दगड ठरेल असा टप्पा सरलेल्या २०१६ सालात गाठला. ३० डिसेंबर २०१६ अखेर कंपनीचा नऊ महिन्यांसाठी एकंदर महसूल आधीच्या तुलनेत ११.९ टक्क्य़ांनी वाढून ५१,३६४ कोटी रुपये झाला आहे.

तथापि सप्टेंबर २०१६ म्हणजे दुसऱ्या तिमाहीअखेर सिक्का यांच्याकडून संपूर्ण वर्षांसाठी अपेक्षित महसुलाबाबत व्यक्त केल्या गेलेल्या पूर्वानुमानाप्रमाणे यंदा कामगिरी होणार नाही, अशी कबुली त्यांनी शुक्रवारी दिली. महसुली अंदाजाविषयी खालावलेले सुधारित संकेत एकंदर भांडवली बाजाराच्या पसंतीस उतरले नाहीत. प्रत्यक्षात ८ ते ९ टक्के वार्षिक महसुली वाढीच्या मूळ पूर्वानुमानात बदल करताना, कमाल अपेक्षित स्तर जरी ९ टक्क्य़ांवरून ८.८ टक्के असा किंचित घसरला असला तरी किमान अपेक्षित स्तर मात्र ८ टक्क्य़ांवरून ८.४ टक्के असा वाढविला आहे.

व्यवसायाच्या दृष्टीने प्रतिकूल हंगामी आणि आकस्मिक निर्माण झालेल्या परिस्थितीजन्य अडचणी लक्षात घेता, तिसऱ्या तिमाहीसाठी कंपनीची वित्तीय कामगिरी अपेक्षेनुरूपच झाली आहे, अशी या निकालासंबंधी सिक्का यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

दरम्यान, गुरुवारचे शेअर बाजारातील व्यवहार संपुष्टात आटोपल्यानंतर या क्षेत्रातील भारतातील अग्रणी टीसीएसने तिमाहीतील निव्वळ नफ्यात वार्षिक तत्त्वावर ११ टक्क्य़ांची वाढ करून तो भरीव ६,७७८ कोटी रुपयांवर नेणारी कामगिरी केली; तथापि विश्लेषकांकडून अपेक्षित नफ्याच्या स्तरापेक्षा चांगला नफा कमावूनही कंपनीने केलेला नेतृत्वबदल बाजाराची निराशा करणारा ठरला. टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रशेखरन यांची गुरुवारीच टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर झाली आणि त्यांच्या जागी टीसीएसची धुरा राजेश गोपीनाथन यांच्याकडे सोपविण्यात आली. गत सहा वर्षांत टीसीएसच्या महसूल आणि निव्वळ नफ्यात तीन पटींहून अधिक वाढीत मोलाचा वाटा राहिलेल्या चंद्रशेखर यांचे जाणे हे कंपनीच्या दृष्टीने काही काळ तरी नकारात्मक ठरेल, अशी गुंतवणूकदारांमध्ये भावना निर्माण झाली.

केवळ नावाचाच ‘सिक्का’, खिशाला पैशाची वाण!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निश्चलनीकरणाचा निर्णय ‘धाडसी’ खराच, त्यातून सामान्य भारतीयांच्या येईल त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या लवचीकतेचाही प्रत्यय दिला, अशा शब्दांत इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांनी नोटाबंदी निर्णयाबद्दल सकारात्मकता व्यक्त केली; परंतु सुटय़ा पैशाविना लोकांना सामोऱ्या जाव्या लागलेल्या अडचणींवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘‘माझ्या नावात केवळ सिक्का (नाणे) आहे, प्रत्यक्षात माझे पाकीट ‘सिक्का’मुक्त (रोकडरहित) बनले!’’ अर्थात देशातील सर्वाधिक वेतनमान मिळविणाऱ्या कंपनी मुख्याधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या सिक्का यांना कागदी नोटांविना पाकीट हे एक रोमांचक परिवर्तन असल्याची पुस्ती जोडली. जलद वेगाने डिजिटल अर्थव्यवस्थेकडे संक्रमणाला यातून चालना दिली गेली आहे. अर्थात देशातील ७० टक्के बँकिंग व्यवस्थेचा डोलारा इन्फोसिस टेक्नॉलॉजीजच्या ‘फिनॅकल’ या सॉफ्टवेअर प्रणालीने पेललेला असल्याने, नोटाबंदीतून गाठले जाणारे डिजिटलीकरणाचे टोक त्यांच्यासाठी मोठय़ा व्यवसायसंधीकडे खुणावणारे आहे, याचीही त्यांनी प्रामाणिकपणे कबुली दिली.