माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारतामधील आग्रगण्य कंपन्यांपैकी एक असणाऱ्या इन्फोसिस कंपनीला जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या यादीमध्ये तिसरे स्थान मिळाले आहे. ‘फोर्ब्स’ नियतकालिकाने जाहीर केलेल्या या यादीमध्ये अर्थ क्षेत्रातील व्हिसा तर ऑटोमोबाइल क्षेत्रातील फेरारी या कंपन्यांनी अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे इन्फोसिसने सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या यादीमध्ये अ‍ॅपल, नेटफिक्स, मायक्रोसॉफ्ट, वॉल्ट डिस्ने आणि मास्टरकार्डसारख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले आहे.

‘फोर्ब्स’ने मागील वर्षी जाहीर केलेल्या सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या यादीमध्ये इन्फोसिस ३१ व्या क्रमांकावर होती. या वर्षी कंपनीने चक्क २९ क्रमांकांनी झेप घेऊन तिसरा क्रमांक पटकावला आहे. ४.५१ कोटी डॉलर (अंदाजे ३२० कोटी रुपये) किंमत असणारी इन्फोसिस ही महितीतंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातील महत्वाची कंपनी आहे. आयटी कन्सल्टींग, सॉफ्टवेअर सर्व्हिसेसबरोबरच इन्फोसिस ई-बिझनेस, प्रोग्राम मॅनेजमेंट आणि सप्लाय चेन्समध्येही काम करते. याशिवाय कंपनी विमा, बँकींग, संवाद (टेलीकम्युनिकेशन), निर्मिती क्षेत्रातही कार्यरत आहे.

‘फोर्ब्स’ नियतकालिकाने जाहीर केलेल्या या सर्वोत्कृष्ट कंपनींच्या यादीमध्ये इन्फोसिसबरोबर १७ कंपन्यांनी स्थान मिळवले आहे. यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस २२ व्या स्थानी, टाटा मोटर्स ३१ व्या स्थानी, एचडीएफसी या कंपन्याचा समावेश आहे. ५० देशांमधील दोन हजार कंपन्यांच्या यादीमधून ‘फोर्ब्स’ने आधी २५० कंपन्या अंतिम फेरीसाठी निवडल्या. त्या अडीचशे कंपन्यांमधून सर्वोत्कृष्ट कंपन्यांची निवड करण्यात आली. कंपनीबद्दल लोकांना असणारा विश्वास, विश्वासार्हता, सामाजिक काम, काम करण्याचे ठिकाण कसे आहे, कर्मचाऱ्यांना कशी वागणूक दिली जाते, कंपनी कोणत्या गोष्टी आणि सेवा पुरवते, त्या वस्तू आणि सेवांचा दर्जा काय असतो अशा अनेक गोष्टींचा विचार करुन ही यादी तयार करण्यात आली आहे.

१९८१ साली नारायण मूर्ती यांनी इन्फोसिसची स्थापना केली. बंगळुरुमध्ये मुख्यालय असणारी इन्फोसिस ही माहिती तंत्रज्ञान निर्यातीच्याबाबतीत देशामधील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. २०१९च्या (मार्च) आकडेवारीनुसार कंपनीमध्ये २ लाख ४ हजार १०७ कर्मचारी काम करतात. १ हजार २७९ क्लायंटर्सला इन्फोसिस सेवा पुरवते.

‘फोर्ब्स’ने जारी केलेल्या यादीमधील २५० पैकी ५९ कंपन्या या अमेरिकेतील आहेत. त्या खालोखाल जपान, चीन आणि भारतीय कंपन्यांची संख्या या यादीमध्ये जास्त आहे. २५० पैकी अर्ध्याहून अधिक कंपन्या या आशिया खंडातील देशांमधील आहेत.