इन्फोसिसच्या माध्यमातून कंपन्यांच्या यंदाच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांची सुरुवात होत आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची माहिती व तंत्रज्ञान कंपनी शुक्रवारी जारी करणाऱ्या चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीद्वारे कंपनी समभाग पुनर्खरेदी अथवा विशेष समभाग-बक्षिसीची घोषणा करते, याकडे तमाम गुंतवणूकदारांची नजर आहे. भांडवली बाजाराने मात्र आधीच सकारात्मकता दाखवीत निकालाआधीच दमदार उसळी घेतली आहे. इन्फोसिसच्या भावाने १ टक्क्यांची कमाई करून रु. २५२६ चा भाव गाठला.
शुक्रवारी सकाळी भांडवली बाजाराची सुरुवात होण्यापूर्वीच इन्फोसिसचे वित्तीय निष्कर्ष स्पष्ट झालेले असतील. निकालदिनी समभाग मूल्यात मोठय़ा प्रमाणात चढ-उतार नोंदले जाण्याचा इन्फोसिसचा ताजा इतिहास आहे. समूहाची सूत्रे संस्थापक नारायण मूर्ती यांनी घेतली असताना आणि तेही कार्यकारी सहायक – पुत्र रोहन याच्याबरोबर असताना इन्फोसिसकडून आगामी पदपथ कसा दर्शविला जातो, याकडेही लक्ष आहे.
इन्फोसिस वित्तीय निकालांबरोबर कंपनीच्या पुढील वाटचालीबाबत देत असलेल्या मार्गदर्शनाच्या आधारावर अनेक विश्लेषक आपले इतर कंपन्यांच्या बाबतीतले आखाडे बांधत असतात. याला अनुसरूनच यंदाही अनेक दलाल पेढय़ांनी आतापासूनच आपली मतेमतांतरे स्पष्ट केली आहेत.
इन्फोसिसकडे असलेली मोठी रोकड अनेक विश्लेषकांना खुपत आहे. वेळीच रोकड व्यवसायासाठी न वापरता गुंतवणुकीसाठी वापरली तर नफा क्षमता कमी होते, असा या विश्लेषकांचा दावा आहे. तर ‘आम्ही योग्य संधीच्या शोधात आहोत’, असे इन्फोसिस व्यवस्थापन गेली पाच वष्रे सांगत आहे. २२,००० कोटी इन्फोसिस कुठे वापरणार याची विश्लेषकांना चिंता भेडसावत आहे. इन्फोसिस व्यवस्थापन ही मालमत्ता समभाग धारकांची असल्यामुळे ती त्यांना परत करूस असे सांगत आहे. तेव्हा ही रोख रक्कम शेअरच्या पुनर्खरेदी करणार की मोठय़ा लाभांशाची घोषणा करणार याची उत्सुकता गुंतवणूक जगताला लागून आहे.

नफा घटण्याचा विश्लेषकांचा कयास
* चालू आर्थिक वर्षांची प्रगती यथातथाच राहिलेल्या इन्फोसिसचा आगामी वाटचाल खाचखळग्यांनीच भरली असल्याचे दिसून येते. ‘डाऊ जोन्स’ने आजमावलेल्या आघाडीच्या १८ विश्लेषकांच्या मते कंपनीचा निव्वळ नफा अवघ्या एका टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर महसुलात १५ टक्क्यांची वाढ होण्याचा कयास आहे.
कंपनीच्या परदेशातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात फेब्रुवारीत झालेली वाढ व त्यानंतरचे रुपयाचे अवमूल्यन यामुळे परदेशातील कंत्राटी कामातून मिळणारा नफा कमी होईल, असा अंदाज बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने आपल्या अहवालात नमूद केले आहे. तर मॉर्गन स्टेनले या गुंतवणूकदार संस्थेला इन्फोसिसचा नफा सर्वसाधारण असेल; त्यात फार बदल संभवत नाही असे वाटते. तर सिटी बँकेने अमेरिकेच्या स्थलांतर विधेयकामुळे इन्फोसिसच्या  नफाक्षमतेबाबत प्रश्न चिन्ह उभे केले आहे. आगामी वर्षांचा नफा २-३% कमी असेल, असे सिटी बँकेचे म्हणणे आहे.
इन्फोसिस २०११ पासून बिकट अर्थनिकाल देत आली आहे. याचबरोबर कंपनीचा बाजारहिस्साही कमी झाला आहे. एकूण उद्योगक्षेत्राच्या वाढीपेक्षा कंपनीची गतीही मंदावली आहे. हे सर्व पाहता उद्याच्या निकालात खालील बाबींकडे लक्ष ठेवावे लागेल –
* महसूल : कंपनीने यापूर्वी ६ ते १० टक्क्यांपर्यंतच्या महसुली वाढीचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र अनेक विश्लेषकांच्या मते ते यंदा ५ ते ९ टक्के राहण्याची शक्यता आहे. कंपनीत पुन्हा आलेले मूर्ती गुंतवणूकदारांचा विश्वास मिळविण्यासाठी यंदा नेमकी आकडेवारी देतात का, हे पहावे लागेल.
* नफा : कंपनीने २०१३ पासून तिच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढविले आहे. वेतनवाढीच नफ्यावर होणारा परिणाम यंदाच्या निकालाने स्पष्ट होईल. गेल्या आर्थिक वर्षअखेर २३ टक्के हा कंपनीने नोंदविलेला किमान नफा होता.