करभरणा करण्याबाबत दुसऱ्यांदा पाठविण्यात आलेल्या सरकारच्या नोटिशीला कायदेशीर आव्हान देण्याचे इन्फोसिसने निश्चित केले आहे. २००८-०९ या वर्षांतील ५७७ कोटी रुपयांच्या कराबाबत चालू महिन्याच्या सुरुवातीला पाठविण्यात आलेल्या नोटिशीला उत्तर देण्याचे कंपनीने ठरविले आहे.
देशातील दुसऱ्या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी म्हणून ओळख असलेल्या बंगळुरूस्थित इन्फोसिसला प्राप्ती कर विभागाने २ मे २०१३ रोजी नोटीस बजाविली होती. याद्वारे ५७७ कोटी रुपयांच्या कर भरण्याबाबत कंपनीला विचारणा करण्यात आली होती. भारतातील विशेष आर्थिक क्षेत्रातील व्यवसायावरील महसूल आणि भारताबाहेरील तिच्या ग्राहकांकडून येणाऱ्या वेतनापोटीची ही रक्कम असल्याचा दावा यानिमित्ताने सरकारने केला होता. आर्थिक वर्ष २००८-०९ साठी कंपनीला उपरोक्त रकमेच्या कराची प्राप्ती कर विभागाने विचारणा केली आहे.
अशाच प्रकारचा कंपनीचा वाद आणखी एका प्रकरणातही सुरू आहे. कंपनी २००५ ते २००८ दरम्यानच्या २० कोटी डॉलरच्या प्राप्ती कराचाही सामना करत आहे. दरम्यान, ताज्या मागणीविरोधात आव्हान देण्यात येणार असल्याचे कंपनीने अमेरिकेच्या भांडवली बाजार नियामक आयोगाला कळविले आहे. इन्फोसिस कंपनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शेअर बाजारातही सूचिबद्ध आहे.