जागतिक भांडवली बाजार कमकुवत असतानाही, स्थानिक बाजारात सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांनी गुरुवारच्या व्यवहारात बहारदार उसळी घेतली. इन्फोसिसच्या नेतृत्वात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी तब्बल १५ टक्क्य़ांपर्यंत घेतलेली विक्रमी झेप निर्देशांक तेजीत मोठे योगदान देणारी ठरली.

करोनाबाधितांच्या संख्येत सुरू असलेली विक्रमी वाढ आणि चीनच्या बाजारातील पडझड पाहता, स्थानिक भांडवली बाजारात गुरुवारच्या व्यवहाराची सुरुवात नरमाईनेच झाली.

मात्र उत्तरार्धातील व्यवहारात अकस्मात मूडपालटासह सेन्सेक्सने दिवसाअखेरीला ४१९.८७ अंशांच्या कमाईसह ३६,४७१.६८ ही पातळी गाठली. बरोबरीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक असलेल्या निफ्टीने बुधवारच्या तुलनेत १२१.७५ अंशांची भर घालत, १०,७३९.९५ ची पातळी गाठली. इन्फोसिसने तिमाहीत १२.४ टक्क्य़ांच्या वाढीसह ४,२७२ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याची विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा सरस कामगिरी केली. परिणामी हा समभाग ९.५६ टक्क्य़ांच्या मुसंडीसह सेन्सेक्सच्या गुरुवारच्या वाढीत सर्वाधिक योगदान देणारा ठरला.

चीनच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर तिमाहीत ३.२ टक्के अशा बहुवार्षिक तळाला पोहोचल्याच्या पुढे आलेल्या आकडेवारीने शांघाई निर्देशांकात ४.५ टक्क्य़ांची गटांगळी दिसून आली. पाठोपाठ हाँगकाँग, टोक्यो आणि सोल या अन्य प्रमुख आशियाई भांडवली बाजार निर्देशांकात पहाटेच्या व्यवहारातील मोठी घसरण पाहता, त्यानंतर खुल्या झालेल्या भारतीय बाजाराच्या प्रारंभिक व्यवहारांवरही नकारात्मक प्रभाव दिसून आला होता.