कोळसा, नैसर्गिक वायूच्या उत्पादनवाढीचा परिणाम

कोळसा, नैसर्गिक वायू आदी प्रमुख आठ क्षेत्रांची वाढ गेल्या महिन्यात सहामाहीच्या वरच्या टप्प्यावर पोहोचली आहे. सप्टेंबरमध्ये प्रमुख  पायाभूत क्षेत्राची वाढ ५.२ टक्के नोंदली गेली आहे.

कोळसा, नैसर्गिक वायू तसेच शुद्धीकरण उत्पादने यांची कामगिरी गेल्या महिन्यात उत्तम राहिल्याचे याबाबत मंगळवारी जाहीर झालेल्या आकडेवारीवरून दिसते.

प्रमुख पायाभूत क्षेत्रात कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, शुद्धीकरण उत्पादने, खते, स्टील, सिमेंट व ऊर्जा यांचा समावेश होतो. या क्षेत्राचा वर्षभरापूर्वीचा, सप्टेंबर २०१६ चा प्रवास किरकोळ अधिक, ५.३ टक्के होता.

यंदा या क्षेत्राने एप्रिल २०१७ नंतरची उत्तम कामगिरी बजाविली आहे. सहा महिन्यांपूर्वी हे क्षेत्र अवघ्या २.६ टक्क्यांनी विस्तारले होते.

सप्टेंबरमध्ये कोळसा, नैसर्गिक वायू, शुद्धीकरण उत्पादने वार्षिक तुलनेत अनुक्रमे १०.६, ६.३ व ८.१ टक्क्यांनी वाढले आहेत.

तर खनिज तेल उत्पादनाची वाढ वर्षभरापूर्वीच्या ४.१ टक्क्यांच्या तुलनेत अवघी ०.१ टक्के राहिली आहे. सप्टेंबरमध्ये ऊर्जा निर्मिती स्थिर राहिली आहे. तर स्टील व सिमेंट उत्पादन कमी नोंदले गेले आहे. खत उत्पादनही घसरले आहे.

एप्रिल ते सप्टेंबर या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांत पायाभूत क्षेत्राची वाढ ३.३ टक्के नोंदली गेली आहे. ती वर्षभरापूर्वी याच कालावधीत ५.४ टक्के होती. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादन निर्देशांकात प्रमुख आठ क्षेत्रांचा ४१ टक्के हिस्सा आहे.