पाव टक्का दरकपातीचा निर्णय गुरुवारी?

व्याजदर बदलाबाबत निर्णय घेण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेची पतधोरण बैठक सोमवारपासून येथील मुख्यालयात सुरू झाली.

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेली ही बैठक चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या द्विमासिक कालावधीसाठीची आहे.

ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे यंदा किमान पाव टक्का रेपो दर कपातीची अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त होत असताना मध्यवर्ती बँकेचा याबाबतचा अंतिम निर्णय प्रत्यक्षात येत्या गुरुवारी जाहीर केला जाणार आहे. यापूर्वीच्या सलग दोन पतधोरणांमध्ये प्रत्येकी पाव टक्का रेपो दरकपात झाली आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सत्तारुढ झाल्यानंतरचे हे पहिलेच पतधोरण आहे.

गव्हर्नर दास यांनी गेल्याच आठवडय़ात तत्कालिन अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर पतधोरण बैठकपूर्व चर्चा केली होती. केंद्रीय अर्थखात्याचा कार्यभार आता पियुष गोयल यांच्याकडे आला आहे. सरकारचा परिपूर्ण अर्थसंकल्प ५ जुलै रोजी जाहीर होणार आहे.