गेल्या अडीच वर्षांपासून मालकी असूनही ब्रॅण्डच्या रूपातील ‘फेम’चा पडदा आयनॉक्सने अखेर दूर सारला आहे. जानेवारी २००१ मध्ये फेमचे शतकभर पडदे ताब्यात घेतल्यानंतर त्यावर आता समूहाच्याच आयनॉक्सची बिरुदावली चिटकवली गेली आहे. त्यामुळे आयनॉक्सअंतर्गत आता २८४ पडदे कार्यरत होणार असून या माध्यमातून समूह देशातील दुसरा मोठा सिनेगृह उद्योग ठरला आहे.
आयनॉक्स समूहाद्वारे २००२ पासून देशात आयनॉक्स याच नावाखाली सिनेमागृह चालविण्यात येतात. समूहाने कंपनीच्या इतिहासातील दुसरी (२००७ मध्ये कोलकाता सिनेमाच्या ८९ पडद्यांचे अधिग्रहणानंतर) ताबा प्रक्रिया राबविल्यानंतर फेमची (फेम इंडिया लिमिटेड) सिनेगृहेदेखील आयनॉक्सच्या पंखाखाली आणली. हा व्यवहार २०११ मध्ये झाला असला तरी आतापर्यंत फेम नावानेच १०२ सिनेमागृहांचे अस्तित्व होते. आता ते आयनॉक्स या सामायिक नाममुद्रेत समाविष्ट झाले असून यामुळे २ अब्ज डॉलरच्या आयनॉक्स समूहाच्या ४० शहरांतील ७३ सिनेगृहांतील पडद्यांची एकूण संख्या २८४ झाली आहे. ३८३ पडद्यांसह पीव्हीआर सध्या सर्वोच्च स्थानावर आहे.
या निमित्ताने बोलताना आयनॉक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक टंडन यांनी सांगितले की, समूह येत्या दोन वर्षांत आणखी ११ ठिकाणी आपले अस्तित्व निर्माण करणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जळगाव या शहराचाही समावेश आहे. आयनॉक्सच्या राज्यातील सिनेमागृह आणि पडद्यांची संख्या अनुक्रमे १९ आणि ७६ आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या सर्वच सिनेगृह २के डिजिटल व ३डी तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात आल्याचेही टंडन यांनी सांगितले. सिनेगृहांसाठीच्या जागेच्या दरांबाबत कंपनीची काहीही तक्रार नसली तरी मनोरंजन आदी कर कमी हवेत, अशी टंडन यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.
* वर्षांला ४.४ कोटी प्रेक्षक संख्या
* वर्षभरात १,००० चित्रपट प्रदर्शित
* देशभरात एकूण ९,००० पडदे
* १० लाख लोकसंख्येमागे १० पडदे
मल्टिप्लेक्स उद्योगाला एका पडद्यासाठी साधारणत: दोन ते अडीच कोटी रुपये खर्च येतो. तर आयनॉक्ससारख्या कंपनीला तिकीट विक्री, खाद्यपदार्थ विक्री व जाहिरातीच्या माध्यमातून अनुक्रमे ७०, २० व १० टक्के महसूल मिळतो.