करोनाकाळात निर्माण झालेल्या अभूतपूर्व प्राणवायूच्या कमतरतेमुळे मराठवाडय़ात औद्योगिक वापरासाठीच्या वायूनिर्मितीचे प्रकल्प सुरू व्हावेत या सरकारच्या प्रयत्नांना यश येत असून ऑयनॉक्स या कंपनीने औरंगाबाद येथे १३५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा प्रकल्प उभा करण्यासाठी लागणारा भूखंड वितरित करण्याचा निर्णय शुक्रवारी दिल्ली – मुंबई औद्योगिक पट्टाचे सह व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांच्या उपस्थितीमध्ये वितरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

या मोठय़ा प्रकल्पाबरोबरच अन्य लघू व मध्यमश्रेणीतील अन्य पाच कंपन्यांकडून २४ कोटी ४२ लाख रुपयांची गुंतवणूक होईल हे स्पष्ट झाले असून अर्जदार कंपन्यांपैकी ११ कंपन्यांना भूखंड वितरणाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

शुक्रवारी १६० कोटी रुपयांची गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना भूखंड वितरित करण्यात आले.  ऑयनॉक्स एअर प्रोडक्टस् या कंपनीला द्रवरुप प्राणवायू व अन्य औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या वायू निर्मितीच्या प्रकल्पासाठी पाच एकराचा भूखंड देण्यात आला असून यातून कौशल्यप्राप्त १५० जणांना रोजगार मिळेल असे सांगण्यात येत आहे.

द्रवरूप प्राणवायू, नायट्रोजन यासह औद्योगिक वसाहतीला लागणारे अन्य काही वायू निर्मितीच्या क्षेत्रात आयनॉक्स ही कंपनी काम करत असून प्रतिदिन १४९ मेट्रीक टन प्राणवायू आणि ५४ मेट्रीक टन नायट्रोजन उत्पादन क्षमतेचा प्रकल्प उभा राहणार आहे.

दरम्यान अन्न प्रक्रिया उद्योगातील एक, औषधी क्षेत्रातील दोन कंपन्यांनाही भूखंड वितरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

औद्योगिकीकरणासाठी वातावरण आणि जमिनीची बॅंक निर्माण करण्यापर्यंतची कारवाई दिल्ली – मुंबई औद्योगिक पट्टयातील शेंद्रा भागात करण्यात येत आहे.

येत्या काळात लघु व मध्यम प्रकल्पांसाठी छोटे भूखंड करण्याचीही प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.