आरोग्य विम्यासाठी स्वतंत्र कंपनीचा निर्णय

रिलायन्स – अनिल धीरुभाई अंबानी समूहातील वित्त सेवा क्षेत्रातील दुसरी कंपनी भांडवली बाजारात उतरण्याची तयारी करत आहे. गृह वित्त पुरवठा क्षेत्रातील स्वतंत्र व नवागत उपकंपनीची सूचिबद्धता झाल्यानंतर रिलायन्स कॅपिटलच्या अंतर्गत येणारी रिलायन्स जनरल इन्शुरन्सचीही चालू आर्थिक वर्षांतच बाजारात नोंदणी होणार आहे.

वित्तीय सेवा क्षेत्रातील रिलायन्स कॅपिटलची विशेष वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मुंबईत झाली. यावेळी कंपनीचे अध्यक्ष अनिल अंबानी व पत्नी टीना व पुत्र जय अनमोल अंबानी हेही उपस्थित होते.

सर्वसाधारण विमा व्यवसायासह, आरोग्य विमा कंपनीचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचे रिलायन्स समूहाचे उद्दिष्ट असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.  याबाबत विमा नियामक ‘आयआरडीएआय’ची परवानगी मिळाल्याचे रिलायन्स कॅपिटलचे कार्यकारी संचालक असलेल्या अनमोल अंबानी यांनी याप्रसंगी सांगितले.

रिलायन्स कॅपिटलच्या अखत्यारीत स्थापन करण्यात आलेल्या रिलायन्स लाइफ इन्शुरन्समधील २३ टक्के हिस्सा जपानी निप्पॉन लाइफला २०१६ मध्ये २,५०० कोटी रुपयांना विकण्यात आला होता.

वित्त, विमा, निधी व्यवस्थापन क्षेत्रातील रिलायन्स कॅपिटलचे नजीकच्या भविष्यात आघाडीचे तिसरे स्थान राखण्याचा समूहाचा मानस आहे.

भांडवली बाजारात गेल्याच आठवडय़ात सूचिबद्ध झालेल्या रिलायन्स होम फायनान्समार्फत निधी व्यवस्थापन ५० टक्क्यांनी वाढले असून बाजार भांडवल ६,००० कोटी रुपयांवर गेले आहे.